हृदयद्रावक! एकाच सरणावर चौघांना निरोप देताना फुटला अश्रूंचा बांध...
मुलगी, जावई व दोन लहानग्या नातवांना अग्नी देण्याची वेळ रघुनाथ जाधव यांच्यावर आली. हृदयद्रावक असे चित्र पाहून अनेकांचे मन हेलावले.
हेदवी जुवेवाडी येथील मनोहर जाधव यांच्या आईचे वर्षश्राद्ध असल्याने गुरुवारी रात्री उशिरा मुंबई येथून जाधव व पंडित कुटुंबीय निघाले होते. शुक्रवारी पहाटे पाच वाजता झालेल्या अपघातात या दहा जणांना मृत्यूने गाठले.
यामध्ये नीलेश पंडित (वय ४५), त्यांची पत्नी नंदिनी (वय ३५), मुलगी मुद्रा (वय १२) आणि मुला भव्य (वय ४) यांचा मृत्यू झाला होता. नीलेश पंडित हे हेदवी गावचे जावई असून, डावखोल (तालुका संगमेश्वर) हे त्यांचे मूळ गाव आहे. गावात घरचे कोणी नसल्याने त्यांच्यावरही हेदवी येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्मशानभूमीत दोनच शवदाहिन्या असल्याने या चौघांनाही एकाच सरणावर ठेवून शेवटचा निरोप देण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठी चिता रचून नीलेश, नंदिनी, मुद्रा व भव्य या पंडित कुटुंबातील चौघांना एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. मुलगी, जावई व दोन लहानग्या नातवांना अग्नी देण्याची वेळ रघुनाथ जाधव यांच्यावर आली. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.


0 Comments