आरोग्यमंत्र्यावर पोलिस अधिकाऱ्यानेच झाडल्या गोळ्या !
ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोरदास यांच्यावर त्यांच्याच सुरक्षा यंत्रणेत कार्यरत असलेल्या पोलिसानेच गोळ्या झाडल्या असून यामुळे देशात खळबळ उडाली आहे.
देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्यावर देखील सुरक्षा राक्षकानेच गोळ्या झाडल्या होत्या आणि यात त्यांचा मृत्यू झाला होता.
असाच काहीसा प्रसंग आज ओरिसा राज्याचे आरोग्य मंत्री नाबा किशोरदास यांच्यावर आला आहे. ओडीसामधील झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराज नगर च्या जवळ त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या यंत्रणेतील पोलीसाने गोळ्या झाडल्या आहेत.
गंभीर जखमी झालेल्या आरोग्य मंत्र्यांना तातडीने रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे परंतु त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. हल्लेखोर पोलीस उप निरीक्षक गोपालदास याला तत्काळ अटक करण्यात आली असून पुढील तपास वेगाने सुरु करण्यात आला आहे.
एका कार्यक्रमासाठी आरोग्यमंत्री नाबा दास हे आलेले असताना ते त्यांच्या गाडीतून उतरत असतानाच एएसआय ने त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. गोपालदास असे हल्लेखोर पोलिसाचे नाव असून त्याने मंत्र्यांवर चार ते पाच गोळ्या झाडल्या आहेत.
या गोळीबार कशासाठी केला हे अद्याप समोर आले नसून त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत असलेल्या पोलिसानेच हा गोळीबार केला आहे. हा पूर्व नियोजित कट असल्याचे देखील सांगण्यात येवू लागले असून पोलीस अधिक तपास करू लागले आहेत.
एक गोळी आरोग्यमंत्री यांच्या छातीत घुसली असून त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका उत्पन्न झाला आहे. गोळीबाराच्या या घटनेने प्रचंड हलकल्लोळ माजला असून कार्यकर्ते देखील संतप्त झाले आहेत.
हल्लेखोर पोलीस उपनिरीक्षक गोपालदास याने मंत्र्यांवर अगदी जवळून गोळीबार केला असून गोळीबार केल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला पकडण्यात आले आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना या घटनेबाबत धक्का बसला असून त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेचे वृत्त ऐकून आपण स्तब्ध झालो असून त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आपण प्रार्थना करीत आहोत असे पटनायक यांनी म्हटले आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाला त्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी घटनास्थळी रवाना केले आहे. या घटनेने ओडिशात प्रचंड खळबळ उडाली असून हा प्रकार नेमका कशासाठी केला गेला याचा उलगडा मात्र अजून झाला नाही.


0 Comments