सांगोला कारची दुचाकीला धडक एक ठार; एक जखमी
सांगोला : भरधाव कारने समोरून दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर सांगोल्यातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हा अपघात मंगळवार, दि. १३ डिसेंबर रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास सांगोला जत रोडवरील लोणविरे शिवारात घडला. चंद्रकांत रावसाहेब इंगोले (वय ५०, रा. खारवटवाडी, सांगोला) असे मयताचे नाव आहे. तर रमेश जाधव (रा. विज्ञान महाविद्यालयाजवळ, सांगोला) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत चुलत भाऊ सुरेश मधुकर इंगोले यांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध फिर्याद दिली.अपघातानंतर पळून जाणाऱ्या कारचा नागरिकांनी पाठलाग केला; परंतु तो सापडला नाही. नागरिकांनी त्या कारचा नंबर मोबाइलमध्ये काढून घेतल्याने पोलिसांचे काम सुकर झाले आहे.
चंद्रकांत इंगोले व त्याचा मित्र रमेश जाधव हे मंगळवारी (एमएच ४५ / एम २८२५) या दुचाकीवरून कडलास ते सोनंद रोडने कामानिमित्त मानेगाव (ता. सांगोला) येथे निघाले होते.
दरम्यान, सोनंदकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला लोणविरे शिवारात समोरून धडक दिली. यामध्ये चंद्रकांत इंगोले जागीच ठार झाला. तर रमेश जाधव हा जखमी झाला. त्याच्यावर सांगोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. चुलत भाऊ सुरेश इंगोले याने पोलिसात फिर्याद दिली आहे
0 Comments