सोलापूर आर्यन शुगर्स : संचालकांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढणार ; टास्क फोर्सची स्थापना ; डीसीसीची एक वर्ष निवडणूक नको
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 104 वी सर्वसाधारण सभा बुधवारी प्रशासक शैलेश कोतमीरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. काही दिवसांपूर्वी प्रशासक शैलेश कोतमीरे यांच्या बदलीची तसेच निवडणुका होतील अशी जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे या सर्वसाधारण सभेत काय होणार कोणकोणते ठराव होणार याकडे लक्ष होते.
बैठकीत बार्शीचे नेते माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या आर्यन शुगरची जोरदार चर्चा झाली. आर्यन शुगरकडे अजूनही 340 कोटींची थकबाकी आहे, ती वसूल होण्यासाठी टास्कफोर्सची स्थापना करून सर्व संचालकांच्या खाजगी प्रॉपर्टीवर बोजा चढवावा असा ठराव करण्यात आला. आर्यनच्या एफआरपीचे अद्यापही 21 कोटी देने आहे ते दिल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही असा इशारा काहींनी दिला.
प्रशासक शैलेश कोतमीरे यांची बदली न करता त्यांना एक वर्ष मुदतवाढ देऊन जिल्हा बँकेची निवडणूक एक वर्ष घेऊ नये असा ही ठराव करण्यात आला आहे.
बँकेने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून अल्पमुदत, मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज थकबाकीदारासाठी प्रस्तावित केलेल्या एक रक्कमी कर्ज परतफेड (ओ.टी.एस.) योजनेची माहिती दिली. तसेच जिल्हयातील शेतक-यांची गरज विचारात घेता रु.३.०० लाखापर्यंत मध्यम मुदत कर्ज योजना बँक नजिकच्या काळात राबविणार असल्याचे सूतोवाच मा. प्रशासकांनी केले.
दोन वर्षे कोरोनात गेल्यानंतर प्रथमच डीसीसी बँकेची सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. प्रशासकांच्या कालावधीत बँकेच्या कारभारात सुधारणा झाली. तोटा व एन.पी.ए. कमी झाला, ठेवी वाढल्या हे महत्त्वाचे बदल प्रशासकांच्या कालावधीत झाले, मात्र बिगरशेती व शेती कर्जाची थकबाकी तशीच आहे या निमित्ताने प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी सविस्तर आकडेवारी सहित पत्रकारांना माहीती दिली या वेळी बँकेचे व्यवस्थापक आर. एन. जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर सभेस सहकारी संस्थांचे प्रतिनिधी व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच बँकेचा अधिकारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.


0 Comments