सांगोला अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल – पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी
शाळेतील मुला मुलींना पळवून नेणारी टोळी महूद मध्ये आली आहे अशी अफवा पसरवणाऱ्या वरती कायदेशीर कारवाई करणार – अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक सांगोला
सांगोला /प्रतिनिधी शाळेतील मुला- मुलींना पळवून नेणारी टोळी महूद मध्ये आलेली आहे आशा अफवांनी गेले दोन दिवस महूद येथील समाज माध्यमावर धुमाकूळ घातला. त्यामुळे पालकांमध्ये घबराहट निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.मात्र ही निव्वळ अफवा असून अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपूर्वी महूद येथील शिवाजी विद्यालय व प्राथमिक शाळा परिसरात एक संशयित वेडसर महिला फिरत होती.या विक्षिप्त वेडसर महिलेस पाहून विद्यार्थ्यांमध्ये मोठी घबराहट निर्माण झाली.त्यातूनच ही महिला मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीचा एक भाग आहे,अशी अफवा वेगाने पसरली.
काही पालकांनी त्या महिलेला अडवून ठेवले.तिच्याकडे चौकशी केली,मात्र ती महिला कोणत्याही प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊ शकत नव्हती.त्यामुळे उपस्थितांचा संशय आणखीनच बळावला.काही जबाबदार नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती देऊन तिला ताब्यात घ्यावे व चौकशी करावी अशी मागणी केली.तर काही उतावीळ तरुणांनी त्या महिलेचे चित्रीकरण करून समाज माध्यमावर पाठविले.
शिवाय त्यासोबत मुले पळवून नेणाऱ्या टोळी संबंधित इतर महिला व पुरुषांचे छायाचित्रे व व्हिडिओ पाठवण्यास सुरुवात केली.त्यातून गैरसमज वेगाने पसरला.गावातील अनेक व्हाट्सअप ग्रुप वर हा मेसेज फिरल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिसरातील पालक शाळेतील शिक्षकांना फोन करून याबाबत विचारणा करू लागले.
संशयीत वेडसर महिलेला येथील काही तरुणांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.महूद येथे सापडलेली महिला मतिमंद असून सांगोला तालुक्यात कोठेही अशा प्रकारची घटना घडलेली नाही.त्यामुळे सोशल मीडियावर कोणीही अशा प्रकारच्या अफवा पसरवू नयेत.अन्यथा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले
मात्र समाज माध्यमावर वेगाने पसरलेल्या अफवांमुळे गेले दोन दिवस महूद येथील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
विश्वास निर्माण करण्याची गरज
मुले पळविणाऱ्या टोळीचा संशय,त्यातून जमलेला जमाव,भेदरलेले पालक अशा परिस्थितीमुळे राईनपाडा(धुळे) येथे घडलेले चुकीचे हत्याकांड या गोष्टी ताज्या असतानाच पोलिसांनी याबाबत नागरिकांना आश्वासित करण्याची गरज आहे.


0 Comments