दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन ग्राम विकास अधिकारी निलंबित ; सरपंचांवर कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री आणि रामपूर गावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या गावच्या दोन्ही सरपंचांवर कारवाई चा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी दिली.
धोत्रीचे आय बी भोज व रामपूरचे ए एन कोळी असे निलंबित झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे नाव आहे.
भोज यांनी 15 व्या वित्त आयोगाच्या 27 लाखाच्या रकमा परस्पर व सरपंच यांच्या सहीने काढून अपहार केल्याची तक्रार उपसरपंच महानंदा चौगुले यांनी केली होती. विस्तार अधिकाऱ्याने चौकशी करून अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना दिला होता. या चौकशी अहवालात 16 लाखाचे मूल्यांकन जुळले आहे. भोज यांचे निलंबन करून खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून सरपंच शांताबाई नारायण व्हटकर यांच्यावर कलम 39 खाली पद कमी करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.
कोळी यांच्याही अनेक तक्रारी होत्या. कामकाजाकडे दुर्लक्ष, सभेला गैरहजर राहणे, बेकायदेशीर नोंदी घेणे, 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमताने अपहार केला आहे. तसेच बीडीओ ची परवानगी न घेता पीएफएमएसद्वारे पेमेंट केली नाही. ग्रामपंचायत सदस्य चंद्रभागा बगले यांनी तक्रार केली होती. या प्रकरणात कोळी यांना निलंबित करण्यात आले आहे. सरपंच भागाबाई कृष्णात सोनटक्के यांच्यावर कलम 39 खाली पदावरून कमी करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.


0 Comments