पालकांनो सावधान..मुले पळविणारी टोळी ! जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सतर्कतेच्या सूचना !
सोलापूर जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी आल्याची केवळ अफवा आहे तथापि शाळा आणि पालकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुले पळवून नेणाऱ्या टोळीचा वावर असल्याची अफवा पसरली असून यामुळे पालकांत दहशत निमाण झाली आहे. केवळ सोलापूर जिल्ह्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या विविध भागात अशाच प्रकरच्या अफवा पसरल्या आहेत आणि यातून एकेक घटना देखील घडू लागल्या आहेत. सांगली जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी समजून पंढरपूरला निघालेल्या काही साधूंना लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
सांगली, पुणे, कल्याण, डोंबिवली, वसई, बीड अशा विविध भागात या नसलेल्या टोळीने दहशत निर्माण केलेली आहे. त्यात सोशल मीडिया अधिक खतपाणी घालू लागला आहे. शाळेतून मुलांना पळवून नेल्याचा एक मेसेज कुणीतरी पसरवला आणि पुणे परिसरात पालकांचे धाबे दणाणले. पोलिसांनी सगळ्या शाळांत चौकशी करून पाहिले असता कुठल्याही शाळेतील मुलांना पळविण्यात आलेले नसल्याचे समोर आले.
'मुले पळविणारी टोळी सक्रीय', 'मुले पळविणारी महिलांची टोळी', 'अमुक तमुक भागातून मुलांना पळवून नेले' अशा प्रकारचे अनेक मेसेज सोशल मीडियावरून पसरत राहिले आणि तितकीच पालकांची चिंता वाढत राहिली.
पोलिसांनी अखेर चौकशी करून ही सर्व अफवा असून एकाही मुलाला पळवून नेण्यात आलेले नाही हे स्पष्ट करावे लागले. राज्याच्या विविध भागात पसरलेली ही अफवा सोलापूर जिल्ह्यातही पोहोचली आणि पालकातून भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षात सोलापूर जिल्ह्यात देखील अशी कुठली टोळी नसून कुठल्याही मुलाला पळविण्यात आलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर टाकले जाणारे संदेश हे विचारपूर्वक टाकणे आवश्यक बनले आहे.
सांगोला तालुक्यातील महूद येथील एका महिलेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर आले आणि मुले पळविणारी टोळी असल्याची अफवा पसरली गेली. महूद येथील एका शाळेच्या परिसरात मनोरुग्ण महिला फिरत होती आणि एवढ्यावर मुले पळविणारी टोळी म्हणून अफवांचे पीक आले आहे.
पोलिसांनी चौकशी करून ही केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे तरी देखील अजूनही सोशल मीडियावर तेच फोटो फिरत असून भीती निर्माण केली जात आहे. हे फोटो पाहून अनेकजण खातरजमा करून घेत आहेत तर अनेकांच्या मनात भीती निर्माण होत आहे. अशा प्रकारची कुठली टोळी नसून पोलिसांच्या दप्तरी तशा प्रकारची कसलीही नोंद नाही, तरीही शाळा आणि पालकांनी सतर्क राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात अशी अफवा पसरल्यापासून काही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. वास्तविक ही एक अफवा असून ती सगळीकडे पसरली आहे तरीही शाळांनी खबरदारी घेण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना नेण्यासाठी अनोळखी व्यक्ती अथवा महिला आली असल्यास शाळांनी पालकांना फोन करून खात्री करून घ्यावी आणि नंतरच विद्यार्थ्याला त्याच्याकडे सोपविण्यात यावे. शाळेच्या परिसरात कुणी अनोळखी व्यक्ती वावरत असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क करण्यात यावा असे आवाहन देखील पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
सोशल मीडियावरून वेगाने अफवा पसरत असल्यामुळे पोलिसांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. कुठल्याही व्हिडीओ अथवा ऑडीओ क्लिपवर विश्वास ठेवू नये आणि आलेले मेसेज खात्री आणि पडताळणी केल्याशिवाय पुढे पाठविण्यात येवू नयेत.
नागरिकांनी कोणतेही संदेश अथवा व्हिडीओ पोलिसांनी सांगितल्याशिवाय व्हायरल करू नयेत, काहीही संशयास्पद वाटले किंवा मोबाईलवरून मुलांच्या अपहरणाच्या संदर्भात काही आले तर त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क करावा, संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पालक, शिक्षक आणि नागरिकांनी ११२ क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.
मुलांना परिस्थिती समजाऊन सांगावी परंतु हे करताना त्यांच्या मनात भीती निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, गर्दी असलेल्या ठिकाणी मुलांना घेवून जाऊ नये तसेच सतत त्यांच्या संपर्कात राहावे, मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेलेच तर त्यांचा हात सोडून नाही आणि त्यांचा स्पर्श होत राहील याची दक्षता घेतली जावी. साडीचा पदर अथवा शर्ट त्यांच्या हातात द्यावा असे देखील आवाहन पोलिसांनी केले आहे.
अनोळखी व्यक्तींशी न बोलणें, त्यांनी दिलेले चॉकलेट, खाऊ, मोबाईल अथवा व्हिडीओ गेम घेण्यात येऊ नये, कुणी हात लावला अथवा पकडले तर आरडाओरडा करून आजूबाजूंच्या लोकांची मदत मागा, रस्त्यावरून जाताना पालकांचा हात सोडू नका आणि मागे पुढे पळू नका असे या मुलांना समजावून सांगण्याच्या सूचना पोलिसाकडून देण्यात आल्या आहेत.


0 Comments