सांगोला काँग्रेस विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेस पक्षास वेठीस धरणाऱ्या तालुक्यातील तथाकथित नेत्याची हकालपट्टी करा...काँग्रेस निष्ठवंतांची मागणी
काँग्रेस विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेस पक्षास वेठीस धरणाऱ्या तालुक्यातील तथाकथित नेत्याची हकालपट्टी करा...काँग्रेस निष्ठवंतांची मागणी
सांगोला (तालुका प्रतिनिधी): राज्यातील शिंदे गट व भाजपचे आमदार वारंवार काँग्रेसच्या नेत्यावर खालच्या पातळीला जाऊन टीका करीत आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगोल्यासाठी निधी दिला असताना देखील त्यांच्यावरती देखील टीका केली जात असल्याने देशासह राज्यातील काँग्रेसची बदनामी होत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातच काँग्रेसचे काही पदाधिकारी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहत आहेत. तसेच त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या आदेशानुसार सांगोल्यात कोठेही आंदोलन न करता आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे संतप्त झालेल्या निष्ठावंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसची बदनामी करणाऱ्यांची हकालपट्टी करा, अन्यथा आम्ही राजीनामे देणार असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील काय भूमिका घेतात याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यात शिंदे गट, भाजप यांच्याविरुद्ध काँग्रेसचा तीव्र संघर्ष सुरू असताना सांगोल्यात मात्र काँग्रेसचे काही प्रमुख पदाधिकारी शिंदे गटाच्या कार्यक्रमात उघडपणे हजेरी लावत असल्याने ते पदाधिकारी काँग्रेस पक्ष वाढवत आहेत की शिवसेनेचा शिंदे गट याबाबत निष्ठावंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या आदेशानुसार सांगोल्यात कोठेही आंदोलन न करता आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. उलट काही पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची. टिंगल केल्याने संतप्त झालेल्या निष्ठावंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाची व नेत्यांची बदनामी करणाऱ्या पक्षासोबत काही जणांची असलेली असलेली मैत्री काँग्रेसला घातक ठरत आहे.
टीका करणाऱ्या नेत्यांसोबत काँग्रेसचे पदाधिकारी जात असल्याने काँग्रेसच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे मनापासून काम करणारे काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी कमालीचे नाराज झाले आहेत. यावर पक्षाने ठोस पावले उचलली नाहीत तर सांगोला तालुक्यातील जिल्ह्याचे, तालुका व शहरचे प्रमुख पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती मिळाली आहे.
चौकट
1) सांगोला तालुक्यातील तथाकथित नेते काँग्रेसच्या विचाराशी फारकत घेत तालुक्यातीळ काँग्रेसच्या विरोधकांशी हातमिळवणी करीत आहेत त्यामुळे तालुक्यातील काँग्रेस नामशेष होण्यास हेच नेते कारणीभूत आहेत येणाऱ्या तालुक्यातील सर्व निवडणुकासाठी काँग्रेस कोणत्याही आघाडीत नाही असे असताना हे नेते कोणत्या अधिकारातून निवडणूक पूर्व आघाडी करू पहात आहेत यास आमचा विरोध आहे अशा घरभेदयाची काँग्रेस मधून हकालपट्टी करावी असे सोलापूर जिल्हा काँग्रेस आय कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार पवार यांनी सांगितले.
2) सांगोला तालुक्यात चाललेल्या प्रकाराबाबत आम्ही वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त केली आहे. माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगोल्याच्या विकास कामांसाठी निधी दिला असतानाही त्यांनी निधी दिला नाही म्हणून आगपाखड केली. बॅनरवर विरोधकांचे फोटो असताना त्या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रा.पी.सी.झपके व तालुकाध्यक्ष सुनील भोरे यांनी उपस्थित राहणे कितपत योग्य आहे.
सदर कार्यक्रमाची पत्रिका आल्यानंतर जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करून कार्यक्रमाला गेले पाहिजे.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची साडेतीन हजार किलोमीटर पदयात्रा देशात परिवर्तन घडवत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते विरोधकांच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. याबाबत आमची नाराजी असून आम्ही जिल्हाध्यक्षांना पत्र दिले असून एकतर त्यांची हकालपट्टी करा किंवा आमचे राजीनामे घ्या असे सांगीतले आहे. - अभिषेक कांबळे, सरचिटणीस, जिल्हा काँग्रेस कमिटी


0 Comments