राधाकृष्ण विखे पाटील सोलापूरचे पालकमंत्री ; आता आता हे लोक चिकटणार ; भाजपच्या कुणी केली कुरबुर?
सोलापूर : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन तब्बल 39 दिवसांनी मंत्रिपदाची शपथ झाली. केवळ 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 9 ऑगस्ट रोजी झालेल्या शपथविधी नंतर 45 दिवसांनी पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व असल्याने निश्चितच भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री मिळणार हे नक्की होते.
दरम्यानच्या काळात सोलापूर जिल्ह्याला तात्पुरत्या स्वरूपात सांगली जिल्ह्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे हे पालकमंत्री होतील अशी चर्चा प्रशासकीय अधिकाऱ्यांमधून ऐकण्यास मिळाली. अखेर 24 सप्टेंबर रोजी सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले. त्यात सोलापूर जिल्ह्याला पूर्वाश्रमी काँग्रेसचे दिग्गज नेते तथा भारतीय जनता पार्टीचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा कारभार देण्यात आला आहे.
पालकमंत्री पदाची नावे जाहीर होतात भारतीय जनता पक्षाच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर ऐकण्यास मिळाला हे तात्पुरते पालकमंत्री आहेत परंतु काँग्रेसचा नेता असलेल्या मंत्र्याला सोलापूर जिल्हा का? दिला आता सोलापुरातील काँग्रेसवाले नक्की त्यांना चिटकणार असा नाराजीचा सूर ऐकण्यास मिळाला.
भाजपच्या कार्यकर्त्यांमधूनही अपेक्षा भंग झाल्याने अनेकजण नाराज असल्याचे बोलले जात आहे. परंतु, हे तात्पुरते पालकमंत्री पद असल्याने जुळून घेण्याशिवाय पर्याय नसल्याचेही भाजपच्याच कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. राज्याचे महसूलमंत्री राज्याच्या मंत्रिमंडळातील अनुभवी नेते असणारे राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री मिळाल्याने निश्चितच सोलापूरच्या विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा सामान्य नागरिकांना आहे.


0 Comments