शिंदे - फडणवीस सरकार कोसळणार ? घटनातज्ञ म्हणतात ---शिवसेना कोणाची? घटनापीठ करणार फैसला
बंडखोरी करून राज्यात स्थापन झालेले शिंदे -फडणवीस सरकार उद्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून जेष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी याबाबत अत्यंत स्पष्ट भाष्य केले आहे.
शिवाजी पार्क मैदानावरून शिंदे गट आणि शिवसेना यांची लढाई मुंबई उच्च न्यायालयात झाली आणि ही लढाई शिवसेनेने जिंकली आहे पण आता उद्या सर्वोच्च न्यायालयात मोठा सामना होणार आहे. एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार यांनी मिळून उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचले आणि भाजप सोबत जाऊन शिंदे गट सत्तेवर आरूढ झाला.
त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेला पुरते उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला असून खरी शिवसेना आमचीच म्हणत निवडणूक चिन्हावर देखील दावा करण्यात येवू लागला आहे. राज्यात राजकारणाची सगळी समीकरणे शिंदे गटाच्या बंडाळीमुळे बदलून गेली आहेत.
'गद्दार' आणि 'पन्नास खोके' राज्यात रोजच गाजत असताना आणि शिंदे गट एकेक डाव टाकत निघालेले असतानाच उद्या राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च सुनावणी आहे. शिंदे सरकार सुसाट निघालेले दिसत असले तरी त्यांच्या डोक्यावर सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार कायम आहे. सोळा आमदारांच्या अपात्रातेसोबत अनेक मुद्दे न्यायालयात आहेत.
शिंदे सरकार स्थापन करताना संविधान दुर्लक्षित करण्यात आले आहे याबाबत विरोधकांनी टीका केली आहेच पण घटनातज्ञ देखील असाच सूर लावत आहेत. राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाची देखील राज्यभर चर्चा झालेली आहे. 'तारीख पे तारीख' होत आता उद्या २७ सप्टेंबर रोजी या प्रकरणात महत्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होत आहे त्यामुळे यावेळी नेमके काय होणार याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष केंद्रित झाले आहे.
जेष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी या निकालाबाबत अत्यंत सूचक विधान केले आहे. हे विधान जेवढे सूचक आहे तेवढेच ते महत्वाचे देखील आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्या निकाल येणे अपेक्षित असून शिंदे गटातील १६ आमदार अपात्र व्हायला हवेत आणि या सोळा आमदारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे. न्यायालयात जर ते अपात्र ठरले तर सरकार कोसळू शकते. विलीनीकरणाच्या कायद्यानुसार दोन तृतीयांश आमदार बाहेर पडावे लागतात आणि दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागले.
सुरुवातीला १६ आमदार बाहेर पडले आहेत आणि ते दोन तृतीयांश होत नाहीत, शिवाय ते विलीनही झालेले नाहीत. दोन्हीही घटना घडलेल्या नाहीत. मुख्यमंत्रीच अपात्र ठरले तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री राहता येत नाही. म्हणजेच राज्य सरकार पडेल आणि राजकरण पुन्हा वेगळ्या वळणावर जाईल असे बापट यांनी म्हटले आहे.
"माझ्या अभ्यासाप्रमाणे पहिल्यांदा जे सोळा आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत ते अपात्र होऊ शकतात" असे जेष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे त्यामुळे उद्याच्या निकालाकडे राज्याचेच नव्हे तर देशाचेही लक्ष लागलेले आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत देखील उद्याच्या सुनावणीत न्यायालयाकडून महत्वाचा आदेश येण्याची शक्यता उल्हास बापट यांनी व्यक्त केली आहे. पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेवू नये असे ७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले होते. आयोगाची कार्यवाही पुढे सुरु ठेवायची की नाही याबाबत उद्या फैसला अपेक्षित आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षाची अत्यंत महत्वाची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयात होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज्य सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. शिवाय या निर्णयावर राज्यातील सत्तेची समीकरणे असून शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात निकाल आल्यास राज्यातील राजकारणाला पुन्हा वेगळे वळण मिळणार आहे.


0 Comments