गाडीतील ‘सीट बेल्ट’बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, कंपन्यांना दिले ‘हे’ आदेश..!!
काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात ‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे निधन झाले. त्यानंतर देशात ‘रोड सेफ्टी’बाबत जोरदार चर्चा सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी केंद्र सरकारही प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने एक मसुदा तयार केला आहे.
कारमध्ये मागच्या सीटवर बसणाऱ्या नागरिकांनाही आता ‘सीट बेल्ट’चा वापर बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या नवीन नियमावर 5 ऑक्टोबरपर्यंत सर्वसामान्य नागरिकांची मतं मागवली आहेत. नागरिकांच्या सूचनांनुसार, नवे नियम लागू केले जाणार असल्याचे समजत
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, वाहन निर्मात्या कंपन्यांना वाहनांच्या मागच्या ‘सीट बेल्ट’साठीही ‘अलार्म’ लावण्यास सांगितलं आहे. मंत्रालयाकडून त्यासाठीचे ‘ड्राफ्ट नोटिफिकेशन’ जारी करण्यात आलं आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या मसुद्यात नेमकं काय म्हटलंय, हे जाणून घेऊ या..
केंद्राच्या मसुद्यात काय..?
M व N श्रेणीतील (किमान चार चाके असणारी) वाहनांमध्ये ‘सीट बेल्ट अलार्म’ अनिवार्य असेल. ओव्हर स्पीडसाठी अलार्म बंधनकारक असेल.
सेंट्रल लॉकसाठी मॅन्युअल ओव्हर राइड.
M1 श्रेणीच्या वाहनांमध्ये ‘चाइल्ड लॉक’ला परवानगी दिली जाणार नाही.
समोरच्या सर्व आसनांसाठी बेल्ट अनिवार्य असेल.
अलार्म तीन स्तरांवर वाजतील.
कारचे इंजिन सुरु झाल्यावर व्हिडिओ वॉर्निंग दिली जाईल.
बेल्ट न लावता वाहन चालवल्यास ऑडिओ-व्हिडिओ वॉर्निंग मिळेल.
प्रवासादरम्यान कोणी बेल्ट काढला, तरी अलार्म वाजत राहील.
रिव्हर्स अलार्म अनिवार्य असेल, म्हणजे गाडी रिव्हर्स घेताना अलार्म वाजेल.
‘सीट बेल्ट’ किमान 10 मिमी ताणणे अनिवार्य असेल. त्यामुळे वॉर्निंग उत्पादनांना प्रतिबंध होईल.
‘अलार्म स्टॉपर’ विकण्यास मनाई
वाहनातील ‘सीट बेल्ट’ न लावल्यास अलार्म वाजू लागतो.. मात्र, त्याचा त्रास वाटत असल्याने अनेक जण कारमध्ये ‘अलार्म स्टॉपर’ हे डिव्हाईस बसवतात. या डिव्हाईसद्वारे ‘सीट बेल्ट अलार्म’ बंद करता येतो. भारतात काही ई-कॉमर्स कंपन्याच्या वेबसाईटवरुन ‘अलार्म स्टॉपर’ डिव्हाईस विकले जात होते.
दरम्यान, ही बाब लक्षात आल्यावर या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना असे डिव्हाईसेस विकणं बंद करण्यास सांगितलं आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करताना, ‘सीट बेल्ट’ न लावणाऱ्या नागरिकांवर दिल्लीसह काही ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनातील ‘सीट बेल्ट’च्या नियमाचं काटेकोरपणे पालन करावं, अन्यथा वाहनधारकांवर दंड आकारला जाणार असल्याचा इशारा दिला आहे. 2024 अखेर देशातील रस्ते अपघात व त्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या अर्ध्यांवर आणणार असल्याचा निर्धार गडकरी यांनी केला आहे..
जागतिक बँकेच्या माहितीनुसार, भारतात दर 4 मिनिटांनी एकाचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार, ‘सीट बेल्ट’ न लावल्यामुळे 2020 मध्ये देशात झालेल्या रस्ते अपघातात 15,146 लोकांचा मृत्यू झाला. तसेच, ‘सीट बेल्ट’ अभावी 39,102 लोक जखमी झाले आहेत…


0 Comments