महाराष्ट्रात खळबळ! हरिहरेश्वरमध्ये शस्त्राने भरलेली बोट आढळली
ओमान सिक्युरिटीची बोट श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यावर हरिहरेश्वर येथे सापडल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी दुपारी संशयित बोट आल्याने एकच खळबळ माजली होती . गंभीर बाब म्हणजे बोटीत शस्त्रास्त्रांचा साठादेखील सापडला असून या बोटीत कुणीही व्यक्ती आढळून आला नाही समुद्रामार्गे दहशतवादी हल्ल्याचा कट असण्याची शक्यता असल्याने रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाळी अधिवेशनातदेखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनी तत्काळ एटीएसला चौकशीचे आदेश देत , सुरक्षा यंत्रणांना अलर्ट केले आहे . मुंबईसह राज्यातील समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास मच्छिमारांना ही संशयास्पद बोट पहिल्यांदा दिसली. एक स्पीड बोट आणि त्यात कोणीही व्यक्ती नव्हती.
मच्छिमारांनी याची माहिती सुरक्षा यंत्रणांना दिली. त्यानंतर ही बोट किनाऱ्यावर आणण्यात आली.प्रशासनाची यंत्रणा समुद्र किनाऱ्यावर दाखल झाली. या संशयास्पद बोटीत एके 47 रायफली आणि काही काडतूसं सापडली. शस्त्रास्त्र सापडल्याने रायगड जिल्ह्यासह इतर ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावरील गावांनाही अलर्ट देण्यात आला. रायगडमध्ये विविध परिसरात नाकाबंदी करण्यात आली. या बोटीचा तपास करण्यासाठी एटीएसचं एक पथकदेखील हरिहरेश्वरच्या दिशेने रवाना झाले.
या बोटीवर सापडलेल्या शस्त्रास्त्रावर लावण्यात आलेल्या स्टिकरच्या माध्यमातून ती ओमानच्या एका कंपनीची असल्याचे उघडकीस आले. नेपच्यून सिक्युरिटी ही ओमान मधील समुद्र किनाऱ्यावर गस्त घालणारी कंपनी आहे. या कंपनीची बोट असल्याचे निदर्शनास आले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी ओमानच्या या कंपनीशी थेट संपर्क साधला. कंपनीने ही बोट आमचीच असल्याचे मान्य केले. जून महिन्यात ओमानच्या समुद्रात काही बोटी भरकटल्या होत्या. त्यांचे रेस्क्यू ऑपरेशनदेखील झाले होते. यापैकीच ही एक बोट असू शकते, अशीदेखील शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.


0 Comments