सोलापुरी नवरीचे सांगलीत खोटे लग्न लावून फसवणूक !
सोलापूर : सोलापुरी नवरीचे खोटे लग्न लावून देवून सांगली जिल्ह्यातील एका नवरोबाला पावणे दोन लाखांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना प्रकाशात आली असून नवरीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलीकडे मुलांचे विवाह होणे ही एक अवघड बाब होऊ लागली आहे, काही वर्षांपूर्वी मुलीना मुलांकडून नाकारले जात होते पण गेल्या काही वर्षात मुलीची निवड ही अंतिम होऊ लागली आहे. आई वडील निवडतील त्या मुलाशी मुलीने गपगुमान विवाह करायचा अशी पद्धत होती परंतु शिक्षणामुळे मुलीना देखील आता स्वतंत्र विचाराचे अधिकार मिळालेले असून आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा निर्णय मुली घेवू लागल्या आहेत. शिक्षणामुळे ही एक मोठी क्रांती झाली आहे.
काही वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नांची चिंता पालकांना असायची पण आता मुलाच्या लग्नाची चिंता केली जात आहे. वाढत्या बेकारीमुळे मुलांचे विवाह होत नाहीत त्यात तरुण पिढी व्यसनाकडे अधिक आकर्षित झाली आहे त्यामुळे मुलांचे विवाह जुळणे कठीण बाब होत चालली आहे. आणि अशा परिस्थितीचा गैरफायदा काही भामटे उठवत असल्याचे दिसत आहे.
बनावट नवरी उभी करून खोटे लग्न लावायचे आणि लग्नाचे दागिने घेवून नवरीने पळून जायचे असे प्रकार अलीकडे वाढीला लागलेले आहेत. राज्यात अशा काही टोळ्या असून ते लग्नाळू तरुणांची आर्थिक फसवणूक करताना दिसत आहेत. अशाच प्रकारे सोलापूर जिल्ह्यातील एका मुलीचा खोटा विवाह लावून पावणे दोन लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हिवरे येथील ३१ वर्षे वयाच्या दत्तात्रय नागेश हसबे या तरुणाची मोठी फसवणूक झाली आहे. खोटा विवाह करून या तरुणाला पावणे दोन लाखांचा गंडा घातला गेला असून सोलापूर आणि कर्नाटक राज्यातील पाच जणांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय हसबे या तरुणाचा विवाह कुठेच जमत नसल्यामुळे संजय खिलारी या त्याच्या एका मित्राने त्याचे लग्न जमविण्यासाठी खटपट सुरु केली. लग्न जुळवून देणाऱ्या जयश्री गदगे नावाच्या कर्नाटकमधील एका महिलेशी संजय याचा परिचय होता. त्यामुळे दत्तात्रय आणि संजय हे या महिलेकडे गेले.
जयश्रीने त्यांना लग्न जुळवून देण्याचे सांगून सोलापुरात एक चांगली मुलगी असल्याचेही सांगितले. मुलीच्या घराच्या लोकांना एक लाख आणि लग्न जुळवून देणाऱ्या एजंट सुनील शहा आणि थनम्मा उर्फ थानुबाई बिराजदार यांना सत्तर हजार रुपये द्यावे लागतील असे जयश्रीने संजय आणि दत्तात्रय यांना सांगितले. सदर मुलीचा फोटो देखील जयश्रीने आपल्या मोबाईलवर दाखवला. मुलीचा फोटो पाहून दत्तात्रय हसबे याने सदर पावणे दोन लाखांची रक्कम देण्याची तयारी दाखवली.
सदर मुलगी आणि दत्तात्रय यांचा विवाह लावून देण्याचे अंतिमत: निश्चित झाले आणि मुलीला लग्नासाठी हिवरे येथे घेवून येण्यासाठी म्हणून पाच हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन देण्यात आली. ठरल्याप्रमाणे जयश्री गदगे, एजंट सुनील शहा, थनम्मा उर्फ थानुबाई बिराजदार, नवरी मुलगी प्रियांका आणि तिची आई दिपाली शिंदे हे खानापूर तालुक्यातील हिवरे येथे दाखल झाले.
त्याच रात्री दत्तात्रय आणि प्रियांका यांचा विवाह लावून देण्यात आला. जुळत नसलेला विवाह जुळला आणि विवाहाचा सोहळा देखील पार पडला त्यामुळे दत्तात्रय हसबे हा मोठ्या खुशीत होता. नव्या जीवनाची आणि सुखी संसाराची स्वप्ने तो पहात होता. मोठ्या प्रयत्नाने अखेर लग्न झाले यासाठी तो आपल्या मित्राचे आणि देवाचेही मनोमन आभार मानत होता. पण त्याचा हा आनंद फार काल टिकला नाही.
शनिवारचा दिवस उजाडला आणि नव्या नवरीची आई दिपाली तसेच नातेवाईक सकाळीच हिवरे गावात दाखल झाले. मुलीला कपडे घ्यायचे आहेत असा बहाणा केला आणि मुलीला भिवघाटात घेवून गेली. नवरा मुलगा दत्तात्रय आणि अन्य नातेवाईक देखील त्यांच्यासोबत गेले.
तेथे मात्र वेगळाच प्रकार घडत होता. नवरी मुलगी प्रियांका हिला घेवून सोलापूरला निघण्याची तयारी सुरु असल्याचे दत्तात्रय याला जाणवले. दत्तात्रय याने विचारणा केली असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली. थनम्मा उर्फ थानुबाई बिराजदार या महिलेने खोटे लग्न लावून देण्याच्या मोबदल्यात आपल्याला २० हजार रुपये दिल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकानी दत्तात्रय याला दिली. लावलेले लग्न, पाहिलेली स्वप्ने आणि व्यक्त केलेला आनंद सगळेच काही खोटे होते हे समजल्यावर दत्तात्रय हादरून गेला.
लग्नाच्या नावाने आपली मोठी फसवणूक झाली असल्याचे दत्तात्रय याच्या लक्षात आले. पोलिसात धाव घेण्याशिवाय त्याच्याकडे आता पर्याय उरला नव्हता. दत्तात्रय याने विटा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि खोट्या लग्नाची कथा पोलिसांना ऐकवली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूर येथील दिपाली शिंदे आणि खोटी नवरी म्हणून लग्नाला उभी केलेली तिची २१ वर्षे वयाची मुलगी प्रियांका यांना अटक देखील करण्यात आली आहे. चिकोडी तालुक्यातील जुगुल येथील जयश्री गदगे, निपाणी येथील सुनील दत्तात्रय शहा, थनम्मा उर्फ थानुबाई बिराजदार, दिपाली शिंदे, खोटी नवरी प्रियांका शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका खोट्या लग्नाची ही कथा ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
0 Comments