Breaking News

सोलापूरचा पॅटर्न आता राज्यात राबविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूरचा पॅटर्न आता राज्यात राबविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


पंढरपूर : सोलापूर जिल्हा महसूल प्रशासनाने राबविलेल्या 'सुंदर माझे कार्यालय' या संकल्पनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच दखल घेतली आहे.सोलापूर जिल्हा प्रशासनाने अनेक कार्यालये स्वच्छ आणि सुंदर केली असून त्यासाठी जवळपास तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा लोकसहभाग मिळविला आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'सुंदर माझे कार्यालय' अभियान जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या कामाचे कौतुक केले.

हे अभियान महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांनी राबवावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत या अभियानासाठी लोकसहभागातून तीन कोटी खर्च झाले. यापुढे आणखी पाच कोटी रुपये सरकारकडून जिल्हा प्रशासनाला देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महसूल विभागाची सर्वच कार्यालये सुंदर आणि स्वच्छ करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

पंढरपूर येथे यावेळी 'सुंदर माझे कार्यालय' या अभियानावर तयार करण्यात आलेली चित्रफीत मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आली. कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांत अधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, उपजिल्हाधिकारी नागेश पाटील तहसीलदार अंजली मरोड, तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार अभिजित पाटील यांच्यासह पंढरपूर, माळशिरस तालुक्याचे तहसीलदार, इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात मोडकळीस आलेल्या कार्यालयांचा होणार कायापालट

जिल्ह्यातील अनेक महसूल कार्यालये मोडकळीस आली असून त्यांना शासनाकडून विशेष निधीची तरतूद नसते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही संकल्पना मनावर घेतली असून कार्यालयांसाठी आता बजेटमध्ये तरतूद करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे.त्यामुळे जिल्ह्यात मोडकळीस आलेल्या कार्यालयांचे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments