Breaking News

सांगोल्याच्या सभेत आ . शहाजी बापू पाटील यांचा संजय राऊत यांना गंभीर इशारा

 सांगोल्याच्या सभेत आ . शहाजी बापू पाटील यांचा संजय राऊत यांना गंभीर इशारा ठाकरे घराणे संपवायची सुपारी राऊतांनी घेतलीय : आमदार शहाजी पाटील


सांगोला - 'संजय राऊत शिवसेनेचे 'नारदमुनी' आहे. आम्हाला शिवसेना समजावण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. ठाकरे घराणे संपवायची सुपारीच राऊतांनी घेतली आहे. आमचं काय जळत होतं ते आम्हालाच माहीत होतं. येत्या अडीच वर्षात येथील जनतेची स्वप्ने निश्चितपणे पूर्ण करणार असल्याचे आश्वासन शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी देत 'टायगर अभी भी जिंदा है!' असे आवर्जून सांगितलं.


नाराजी नात्याच्या सत्ता समीकरणानंतर व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बहुमत चाचणीनंतर शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील आज मंगळवार (ता. 5) रोजी आपल्या सांगोला मतदार संघात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत करून ' बापू तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है !' अशी घोषणाबाजी ही केली. यावेळी आमदार शहाजी पाटील यांची सांगोला येथील विद्यामंदिर पटांगणात जाहीर सभा झाली. त्या सभेला कार्यकर्त्यांना उद्देशून आमदार शहाजी पाटील बोलत होते.


आमदार शहाजी पाटील पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवसेनेला लागलेली वाळवी आम्ही काढून टाकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला बाहेर नेले नसून आम्हीच शिंदे साहेबांना बाहेर घेऊन गेलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्यावर टीका करताना आमदार पाटील म्हणाले की, अजित पवार यांनी माझ्या झाडी, डोंगराचा उल्लेख केला याबद्दल धन्यवाद देतो. परंतु सांगोल्याला दिलेल्या निधीचा तुम्ही जाहीर उल्लेख करता तसाच अजितदादा तुम्ही तुमच्या मातेची शपथ घेऊन बारामतीला दिलेला निधीही जाहीर करा असा थेट सवालच त्यांनी पवार यांना केला. आजपर्यंत एवढा निधी देऊनही बारामतीचे कामच संपेना. यावर आता पीएचडीच करावी लागेल असेही ते म्हणाले.


या सभेसाठी यावेळी माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत, सागर पाटील, दिग्विजय पाटील, प्रा. संजय देशमुख, शहाजीराव नलवडे, उदयबापू घोंगडे, गुंडा खटकाळे, विजय बाबर, संभाजी आलदर, समीर पाटील यांच्यासह आमदार शहाजी पाटील गटांचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय देशमुख यांनी केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत, डॉ. विजय बाबर, संभाजी आलदर आदिंनी मनोगत व्यक्त केले.

मुख्यमंत्री भेटत नव्हते -

आपल्या अडीच वर्षाचे आमदारकीच्या काळात फक्त दोनदा मुख्यमंत्री यांची भेट झाली तीही इतर आमदारांसोबत. त्यामुळे तालुक्यातील प्रश्नांची, समस्यांची स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाच करता येत नसल्याचा खंतही आमदार पाटील यांनी यावेळी बोलून दाखवला.


पुन्हा ओके... -

यावेळी तालुक्यातील राजकारणावरून बोलताना आमदार शहाजी पाटील माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील व शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उद्देशून म्हणाले की, एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माझे काम ओके आहे. यापुढे तुमचं तुम्ही बघा. येथे आठ ते दहा दिवसात अजूनही राजकीय उलताफलती होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल..! असे भाषणात पुन्हा बोलून त्यांनी मी माझी रांगडी, माणदेशी व बोलीभाषा बोललो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments