सांगोल्याची नगरपालिका निवडणूक गाजणार!
आमदार शहाजीबापू पाटील हे ज्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या सांगोला शहराची नगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे. युती, आघाडीच्या राजकारणात शेकापची काय भूमिका राहणार?, आ. शहाजीबापूंना त्यांच्या लोकप्रियतेचा या निवडणुकीत फायदा होईल का?
सांगोला/ “काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील” या डायलॉगमुळे प्रचंड चर्चेत आलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील हे ज्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या सांगोला शहराची नगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे. युती, आघाडीच्या राजकारणात शेकापची काय भूमिका राहणार?, आ. शहाजीबापूंना त्यांच्या लोकप्रियतेचा या निवडणुकीत फायदा होईल का?
वाचा सविस्तर….
नगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. सार्वत्रिक निवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने तयारीला वेग आला आहे. ज्या जिल्ह्यात पर्जन्यमान कमी आहे, त्या भागातील पालिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपालिकेचा देखिल समावेश करण्यात आला आहे.
या निवडणुकीसाठी २२ जुलै ते २८ जुलैला उमेदवारांनी अर्ज दाखल करावयाचे आहेत. तर १८ ऑगस्ट रोजी मतदान आणि १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागून राहिलेल्या नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने राजकीय डावपेचांना सुरुवात झाली आहे.
गतवेळी सांगोला नगरपालिका निवडणूक ही राज्यात गाजली होती. आनंदा माने यांनी वेगळाच करिश्मा केला होता. त्यांच्या सुविद्य पत्नी राणीताई माने या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा झाल्या होत्या. माने यांनी शेकाप आणि राष्ट्रवादीला हाबडा दिला होता. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपूर्वी शेकाप आणि आनंदा माने गट एकत्र आलेला आहे. त्यांची एकत्रित ताकद सत्ता समिकरणात कितपत यशस्वी होईल हे आगामी काळात पहावे लागेल.
दुसरीकडे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे आणि काँग्रेस एकत्र आलेली आहे. ही घोषणा सहा महिन्यापूर्वी केली होती. आता बापूंनी वेगळीच भूमिका घेतल्याने नगरपालिका निवडणूक कशी होणार? याची चर्चा मात्र सांगोल्यात रंगू लागली आहे.
सध्या राज्यात शिवसेनेतील बंडखोर आमदार आणि भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. सांगोल्यात भाजप आणि शिवसेना यांचे चित्र कसे राहील? हे पाहणे सुध्दा महत्वाचे आहे. जवळ्याचे श्रीकांत देशमुख यांच्याकडे भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. देशमुख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. राज्यपातळीवर झालेली युती शहर पातळीवर होणार का हेसुद्धा आगामी काळात पहावे लागेल.
शेकापचा लागणार कस
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात प्रथमच सांगोलानगरपालिकेची निवडणूक होत आहे. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही नातूंनी शेकापला उभारी देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, त्याचा नगरपालिका निवडणुकीत किती फायदा होईल ते काही दिवसातच कळणार आहे.
असा असेल कार्यक्रम
पालिकांसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. जिल्हाधिकार्यांनी २० रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावयाचा असून, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शनिवारपासून (दि. ९) या पालिकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यावर्षीही ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची सुविधा केली आहे.
दि. २२ ते २८ जुलै या दरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. यामध्ये सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. दि. २९ जुलै रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत ४ ऑगस्ट २०२२ पर्यंत राहणार आहे. त्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप होईल. ४ ते १८ ऑगस्ट असा १४ दिवसांचा कालावधी उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहे.
अर्ज दाखल करणे : दि. २२ ते २८ जुलै
अर्ज छाननी : २९ जुलै
अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ ऑगस्ट
अपिल असल्यास : ८ ऑगस्टपर्यंत अर्ज मागे
मतदान : १८ ऑगस्ट
मतमोजणी : १९ ऑगस्ट


0 Comments