सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील नॉटरिचेबल; पाटील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये
एकमेव आमदार शहाजी पाटलांच्या बंडामुळे सोलापूर शिवसेनेत खळबळ!
सांगोला : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले सांगोल्याचे शहाजी पाटील हे असल्याचे आाता निष्पन्न झाले आहे. आमदार शहाजी पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉटरिचेबल आढळले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे, त्याची महाराष्ट्रात जोरदार चर्चा होत असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतील १३ आमदार घेऊन गुजरातमध्ये गेल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातही शिवसेनेला असाच धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले आमदार शहाजी पाटील हेही सध्या नॉटरिचेबल आहेत.
आमदार शहाजी पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांचे संबंध घनिष्ठ असल्याचे वेळोवेळी सांगत होते. अनेक जाहिराती व बँनरवर आमदार शहाजी पाटील व मंत्री एकनाथ शिंदे यांचे यांचे एकत्रीत फोटोही झळकत होते. तसेच, सांगोला शहरात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून मोठा प्रमाणात निधीही उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळेच सध्या नॉटरिचेबल असलेले शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे.
सध्या सांगोला तालुक्यातही आमदार शहाजी पाटील यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात सांगोला तालुक्यातील राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे.


0 Comments