एक झेंडा, एक पक्ष, एक मतदारसंघ आणि 55 वर्षे आमदार ! 

१ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण यांनी जशी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली तशीच त्यांनी कॉंग्रेस पक्षासाठी सुद्धा नेत्यांची नवी फळी तयार केली.


त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षातीलही अनेक नेते कॉंग्रेसमध्ये नेले. त्यावेळी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षातील अनेक नेते यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले. यात अनेक दिग्गज नेत्यांची नावे सांगता येतील. पक्षाच्या स्थापनेपासून असलेली कॉ. दत्ता देशमुख, क्रांतिवीर नाना पाटील, व्ही. एन. पाटील ही मंडळी प्रथम पक्षाबाहेर गेली. नंतर शंकरराव मोरे, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव हे पक्षाचे संस्थापकच कॉंग्रेस पक्षात गेले.


पण अश्या परिस्थितीतही आश्वासनांना बळी न पडता एक आमदार मात्र आपल्या पक्षासोबत कायम राहीला तो आमदार म्हणजे गणपतराव देशमुख

यशवंतराव चव्हाण यांचा निरोप

गणपतराव देशमुख यांची तब्बल ५० हून अधिक वर्षाची संसदीय कारकीर्द आहे. १९५१ साली ते विधानसभेत निवडून आले. त्यानंतर २०१९ पर्यंत (एक अपवाद वगळता) सांगोला विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या जवळपास ६० वर्षाच्या राजकीय कारकीर्दीमध्ये गणपतराव यांनी एकदाही पक्ष बदलला नाही.


गणपतराव देशमुख यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

“अनेक वेळा मला कॉंग्रेसमध्ये बोलावण्यात आलं. स्वत:  यशवंतरावांनीच मला त्याबद्दलचा निरोप काडादींमार्फत पाठवला होता. काडादी कॉंग्रेसचे खासदारकीचे उमेदवार होते. मी त्यांना नम्रपणे सांगितलं, दाजिबा देसाई, एन.डी. पाटील, मी, अशा आम्ही सर्वांनी मिळून पक्ष पुढे न्यायचा ठरवलं आहे. शब्द मोडून कॉंग्रेस पक्षात यायचं, हे योग्य होणार नाही. ”पुढे यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे शेकापमधील अनेक दिग्गज नेते कॉंग्रेसमध्ये गेले. मागच्या काही वर्षात तर शेकापचा राज्यभरातलं नेतृत्व संपत गेले. पण गणपतराव मात्र कायम राहिले.


मंत्रीपदाची ऑफर तरीही पक्षातर नाही

यशवंतराव चव्हाण दिल्ली मध्ये गेल्यानंतर वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी वसंतराव नाईक यांनी देखील गणपतराव यांना १९७२सालच्या निवडणुकीनंतर पुन्हा कॉंग्रेसमध्ये घेण्याचा प्रयत्न केला.

त्या वेळी वसंतराव नाईक यांनी शंकरराव पाटील यांच्या मार्फत निरोप पाठवला होता,

“तुम्ही कॉंग्रेसमध्ये या. सोलापूर जिल्ह्यातून कोणी मंत्री नाही. तुम्हाला आम्ही राज्यमंत्रिपद देऊ.”

मंत्रीपदाची ऑफर दिल्यानंतर देखील गणपतराव यांनी वसंतराव नाईक यांना निरोप पाठवला,

“आम्ही राजकारणात पदं मिळावी म्हणून कधीही आलो नाही. सत्तेचं अजिबात आकर्षण नाही. माझ्याकडं काही नसताना मला लोकांनी मदत केली आहे. माझे सहकारी जिवाभावाचे आहेत. माझ्या हातून पक्षांतर घडणार नाही.”

एक पक्ष, एक मतदारसंघ आणि ११ वेळा आमदारकीचा विश्वविक्रम