सोलापुरातून पेटली तिसऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात असंतोषाची ठिगणी !
सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या कामाबद्दल असंतोषाची ठिणगी पडून त्यांच्यावर नामुष्कीची वेळ येण्यासाठी ‘सोलापूर' कारणीभूत ठरण्याचा हा तसा तिसरा (हॅटट्रीक) प्रसंग ठरू शकतो. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास संबंधितांना वेळ लागला. पण, त्याची सुरुवात मात्र स्वपक्षीयांनी अन् तेही सोलापूरकरांनी केल्याची नोंद इतिहासात होत आहे.
काँग्रेसच्या कारकिर्दीत तत्कालीन आमदार सुशीलकुमार शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) बॅ. बाबासाहेब भोसले यांच्याविरुद्ध संघर्षाची ठिणगी पेटविली होती. त्यानंतर (कै.) आमदार आनंदराव देवकते यांनी पुकारलेल्या बंडातून तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक असंतोषाचे बळी ठरले होते. शिवसेनेचे आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी मार्च २०२२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेतील सुप्त संघर्षाला मोकळी वाट करून देत असंतोषाची ठिणगी पेटविली. त्यांचा राग जरी राष्ट्रवादीवर असला तरीही संघर्षाची ठिणगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कारभारावर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
'बंडखोरांप्रमाणेच आमच्याही व्यथा; तरीही आम्ही उद्धव ठाकरेंसोबत!'
सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्वपक्षीय आमदारांच्या रोषाचे बळी होण्याची वेळ आली आहे. शिवसेनेचे एकनिष्ठ व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली तब्बल तीन डझनावर आमदारांनी बंड केले आहे. शिवसेनेतील मंत्री, आमदारांची कामे होत नाहीत. जनतेच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. राष्ट्रवादीकडून सेनेच्या नेते व कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा याबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही बंडाळी माजली आहे.
या संदर्भातील असंतोषाची सुरुवात सोलापुरातून झाली.युवा सेनेचे सचिव वरुण देसाई यांच्या उपस्थितीत सोलापुरात २८ मार्च २०२२ रोजी संकल्प मेळावा होता. या मेळाव्यात मूळचे वाकावचे (ता. माढा, सोलापूर) व भूम-परांड्याचे आमदार तानाजी सावंत यांनी सत्तेत भागीदार असतानाही पक्ष नेत्यांची व कार्यकर्त्यांची कशी अडचण होते आहे, याबाबत सडेतोड भाष्य केले होते. मोठमोठ्या कंत्राटाची कामे राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याला, तर शिवभोजन थाळीचे काम शिवसैनिकाला देण्यात येत आहे.
यातून कोणाची किती कमाई होते, यावरही जोरदार कटाक्ष टाकला होता. अशा विविध प्रकरणातून शिवसैनिकांची गळचेपी होत असल्याची खंत व्यक्त केली होती. जिल्ह्यातील कोणत्याही सत्तेत सहभागी होता येत नसल्याने सामान्य शिवसैनिकाची कुचंबणा कशी होते, याचे उदाहरणासह चित्र रंगविले होते. शिवसेना पक्षप्रमुख मात्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर हातमिळवणी करत असल्याचे चित्र त्यांनी सखेदाश्चर्य व्यक्त केले होते. त्यांच्याकडून असंतोषाची पहिली ठिणगी पडल्याने शिंदे यांच्यासोबत बंडाच्या मोहिमेत ते आघाडीवर आहेत.


0 Comments