नवीन कामगार कायद्यानुसार आता होणार ‘हे’ बदल; कर्मचाऱ्यांना नोकरी सोडताच दोन दिवसांत मिळणार फुल पेमेंट
मुंबई :जुलै महिन्यामध्ये भारतात केंद्र सरकारकडून नवा कामगार कायदा लागू करण्यात येणार आहे. या नवीन कामगार कायद्याचा सर्व कर्मचाऱ्यांवर लक्षणीय परिणाम होईल, असं बोललं जात आहे. या नवीन कामगार कायद्यामध्ये एक चांगली गोष्ट समाविष्ट करण्यात आली आहे, ती म्हणजे कर्मचाऱ्याने कंपनी सोडल्यानंतर कंपनीला जे काही देणे असेल ते पूर्ण पैसे दोन दिवसात मिळतील. सध्याच्या कामगार कायद्यानुसार हे फुल अँड फायनल पेमेंट 30 ते 60 (सरासरी 45 दिवस) दिवसात मिळते. नवीन कामगार कायद्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी समाविष्ट केल्या आहेत, ज्यामध्ये पगार, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित काही बदल केले आहेत.
नव्या कामगार कायद्याच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांचे इन-हँड पगार कमी होणार असले तरी पीएफमधील योगदान मात्र वाढणार आहे. यामध्ये वाढणारे योगदान केवळ कर्मचाऱ्यांच्या बाजूने असेल तर कंपनी देखील कर्मचार्यांच्या खात्यातही तेवढीच रक्कम जमा करेल. नवीन कामगार कायद्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुट्टीमध्ये देखील बदल जाणवेल.
यापूर्वी आठवड्यातून तीन दिवसांची सुट्टी असावी, अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना नवीन कामगार कायद्याप्रमाणे फक्त आठवड्यातून चार दिवस काम असेल आणि तीन दिवसांची सुटी मिळेल. कामाचे तास 9 वरून 12 पर्यंत वाढवले जातील.
नवीन कामगार कायद्यानुसार कंपनीने 12 तासांच्या कामाची शिफ्ट लागू केल्यास कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची सुट्टी द्यावी लागेल. नव्या कामगार कायद्यात कामगारांचे मूळ वेतन एकूण पगाराच्या किमान 50 टक्के ठेवण्याची तरतूद केली जाऊ शकते. यामुळे भविष्य निर्वाह निधीमध्ये मालक आणि कर्मचारी यांचे योगदान वाढेल.


0 Comments