महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट! एकनाथ शिंदेंचा गट मनसेमध्ये विलीन होणार?
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडतांना दिसून येत आहेत. अनेक ट्विस्ट सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहेत. मात्र, आता राजकारणातील हा सामना सुप्रीम कोर्टात लढला जाणार आहे.
दरम्यान, आज सोमवारी सकाळी 10.30 वाजता कोर्टामध्ये एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीला सुरूवात होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या शिवसेनेच्या तिकीटावर जिंकून आलेले 39 आमदार आहेत. पक्षांतर बंदी कायदा लागू होण्यापासून वाचायचं असेल तर शिंदे गटाला दोन-तृतियांश आमदारांची गरज आहे. विधानसभेमध्ये शिवसेनेचे 55 आमदार आहेत, म्हणजेच दोन-तृतियांश आमदारांसाठी त्यांना 37 आमदारांची गरज आहे. मात्र, सध्याची स्थिती पाहता त्यांच्याकडे 2 आमदारांची संख्या जास्त आहे.
पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार एकनाथ शिंदे यांना त्यांच्या या गटाचं एका पक्षात विलिनिकरण करावं लागेल, पण दोन-तृतियांश आमदारांचं गट ठेवून विलिनिकरण न करता शिंदे गट विधिमंडळात बसू शकतो, असंही काही घटनातज्ज्ञांचं मत आहे.
शिंदे गटाकडे दोन-तृतियांश आमदार असतील तर त्यांना भाजप किंवा बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये विलीन व्हावं लागेल, असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पण यात नवा ट्विस्ट समोर आला आहे. शिंदे गटाला विलीन व्हावं लागलं, तर त्यांच्याकडे मनसेचा पर्याय असू शकतो का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरेंच्या मनसेकडे सध्या राजू पाटील हे एकमेव आमदार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना फोन केला असल्याचं सूत्रांकडून समजतंय.गुवाहाटीमध्ये असलेला शिंदे गट हा वारंवार शिवसेनेवर हिंदुत्वाशी प्रतारणा केल्याचा आरोप करत आहे. हिंदुत्वासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असलेली युती तोडा, असं शिंदे यांचा गट शिवसेनेला वारंवार सांगत आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचाच मुद्दा उपस्थित केल्यामुळे शिंदे गटाला मनसेमध्ये विलीन व्हायचा मार्ग सोयीस्कर आहे.


0 Comments