Breaking News

पंढरीत आग, कॉटन एक्स्पो मॉल जळून खाक !

 पंढरीत आग, कॉटन एक्स्पो मॉल जळून खाक !

पंढरपूर : येथील स्टेशन रोडच्या गजबजलेल्या परिसरातील एका मॉलला भर दुपारी आग लागली असून प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.


पंढरपूर शहरातील सतत गजबलेला आणि अखंड वर्दळ असलेला स्टेशन रोड आज धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा यांनी लपेटून गेला आहे. स्टेशन रोड वरील एक्स्पो कॉटन मॉल ला भर दुपारी अचानक आग लागली आणि ही आग काही क्षणात प्रचंड भडकली. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट आकाशाच्या दिशेने झेपावू लागले. आजूबाजूला दुकानांची गर्दी असल्यामुळे या आगीचे परिणाम आणखी भयानक होण्याची परिस्थिती निर्माण झाली. अत्यंत तातडीने धाऊन आलेल्या अग्निशामक दलाने ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला परंतु बराच वेळ आग नियंत्रणात येत नव्हती. अग्निशामक दलाने ही भडकलेली आग शेजारी दुकानाला लागू दिली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला असला तरी कॉटन एक्स्पो मॉलचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. 


आग लागताच रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी नियंत्रणात ठेवून आग विझविण्याचे काम करावे लागत होते. पोलीस या गर्दीला हटविण्याचा प्रयत्न करीत राहिले तर अग्निशामक दल आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. आगीचे स्वरूप अत्यंत भीषण असल्याचे दिसत होते. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजत नसले तरी शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. आगीत झालेले नुकसान प्रचंड मोठे असल्याचे दिसत असून आग पूर्णपणे विझल्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार आहे तथापि या आगीत संपूर्ण मॉल जळून खाक झाला आहे.

Post a Comment

0 Comments