google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मुलांना विष पाजून आईचीही आत्महत्या !

Breaking News

मुलांना विष पाजून आईचीही आत्महत्या !

 मुलांना विष पाजून आईचीही आत्महत्या !

पंढरपूर : आपल्या दोन मुलांना विष पाजून आईनेही आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे घडली असून कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे.


दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ येथे बुधवारीच अशा प्रकारची एक घटना घडली होती. तीस वर्षीय आईने आपल्या लहान दोन मुलासह आलेगाव येथे एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आईने आपल्या पाच आणि आठ वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याने सोलापूर जिल्हा हळहळला होता. अलीकडेच पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या काठावर शेगाव दुमाला हद्द्दीत देखील आत्महत्येची घटना घडली होती  आणि त यानंतर आता पेनूर येथे अशीच क्लेशकारक घटना घडली असल्याचे समोर आले आहे. घरगुती वादातून आईनेच आपल्या दोन मुलांना विष पाजले आणि स्वत: देखील आत्महत्या केली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याचेच दिसत असून यात घरगुती वाद टोकाला जात असल्याचे आढळून येत आहे. 


मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील प्रियंका सुरज चवरे या ३२ वर्षीय मातेने घरगुती वादाला कंटाळून हे मोठे आणि टोकाचे पाऊल उचलले आहे. पतीसोबत झालेल्या वादातून सदर घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. काल घरात कुणी नसल्याची संधी साधत प्रियंका चवरे यांनी आपल्या सहा महिन्यांच्या मुलीसह पाच वर्षाच्या मुलास विष पाजले आणि त्यानंतर स्वत:ही विष प्राशन केले. त्यानंतर काही वेळाने नातेवाईक घरी आले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनाला आला. सदर प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ उडाली आणि धावाधाव सुरु झाली. तातडीने त्यांना उपचारासाठी  पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


दोघांचा मृत्यू !

विषप्राशन केल्यानंतर तिघांना पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु आई प्रियंका चवरे आणि सहा महिन्यांची मुलगी परी यांचा मृत्यू झाला. पाच वर्षे वयाचा मुलगा शंभू हा मात्र बचावला असून त्याच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटनेमुळे खळबळ तर उडालीच  परंतु माय लेकरांचा प्राण गेल्याने मात्र प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments