“माझे शब्द लिहून ठेवा, एक दिवस ऊसामुळं आत्महत्येची वेळ येईल”
सोलापूर : पेरणीसाठी शेतीची मशागत करताना दिसणारा शेतकरी सध्या शेतात उभा असणाऱ्या ऊसामुळं चिंतेत आहे. राज्यात सध्या शेतकऱ्यांना भेडसवणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे ऊस शेती आहे अशी धारणा आता सर्वांची होत आहे. अशात आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ऊस शेतीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सोलापूरच्या पट्ट्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ऊस गाळप होत आहे. पण दिवसेंदिवस ऊसाचं क्षेत्र असंच वाढत राहिल आणि लोकही ऊसाच्याच मागं लागले तर एक दिवस ऊसामुळं आत्महत्येची वेळ येईल, माझा शब्द लिहून ठेवा, असं रोखठोक वक्तव्य नितीन गडकरींनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उद्देशून केलं आहे.
ब्राझीलचं शिष्टमंडळ दोन दिवसांपूर्वी माझ्याकडं आलं होतं. तेव्हा बोलताना ते म्हणाले की ब्राझीलमध्ये दुष्काळ आहे. पण तिकडं ऊसाचे उत्पादन वाढलं तर तुम्ही काय कराल, असा सवाल गडकरींनी उपस्थित केला आहे. एकेकाळी सोलापूर हा दुष्काळी जिल्हा होता पण आज सोलापूरच्या भागात तब्बल 22 लाख टन ऊसाचं गाळप झालं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र वाढत राहीलं तर एक दिवस आत्महत्येची वेळ येईल, असं गडकरी म्हणाले आहेत.
दरम्यान, याअगोदरही आपल्या भाषणात गडकरींनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर निशाणा साधला आहे. सध्या राज्यात शेतकऱ्यांना त्यांच्या उभ्या ऊसाची चिंता सतावत आहे. मोठ्या प्रमाणात कारखाने वाढले असताना देखील ऊस शेतात उभा आहे परिणामी शेतकरी नैराश्याच्या गर्तेत जाण्याची भिती आहे.


0 Comments