पंढरपूर: अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गुन्हा दाखल झाल्याच्या भीतीने गळ्यावर ब्लेड मारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न!
पंढरपूर: साडेतेरा वर्षे वयाच्या मुलीवर तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात घडल्याचे उघडकीस आले आहे.
‘वडिलांनी बोलावले आहे’, अशी थाप मारून नंतर जबरदस्तीने चिलारीच्या झुडूपांमध्ये नेऊन साडेतेरा वर्षे मुलीवर तरुणाने बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होत असल्याचे समजता बचावासाठी तरुणाने पुन्हा माग काढत येत शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील बाथरूममध्ये स्वतःच्या गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. विठ्ठल सत्यवान लोखंडे (वय ३०, रा.तुळशी, ता.माढा) असे त्या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास यातील अल्पवयीन मुलगी ही घराजवळ एकटी असताना लोखंडे हा तेथे गेला. त्याने तिला ‘मेडिकल करायचे आहे. तुला वडिलांनी बोलावले आहे’, अशी थाप मारून सोबत घेतले. त्यानंतर जबरदस्तीने तुळशी वृंदावन परिसरातील चिलारीच्या झुडपांमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकी देऊन तो निघून गेला. या प्रकाराने पिडीत अल्पवयीन मुलगी घाबरून गेली. दरम्यान, त्रास होऊ लागल्यानंतर तिने घरच्यांना हा प्रकार सांगितला.त्यामुळे, शनिवारी सकाळी या अत्याचाराची तक्रार देण्यासाठी पिडीतेसह पालक शहर पोलीस ठाण्यात आले.
परंतु, अगोदरपासूनच पाळत ठेऊन असलेला विठ्ठल लोखंडे हा ही मागोमाग आला पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या बाथरूममध्ये जाऊन त्याने सोबत आणलेले ब्लेड स्वतःच्या गळ्यावर मारून घेतले. हा प्रकार पोलिसांना आढळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पिडीत अल्पवयीन मुलीच्या तक्रारीपासून बचाव व्हावा , या हेतुने त्याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक प्रसाद औटी यांनी फिर्याद दाखल केली असून लोखंडे याच्या विरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.तसेच बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या (पोस्को) विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत हे करीत आहेत.


0 Comments