सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भीषण अपघात !
सोलापूर अपघातात पाच जणांचा मृत्यू.. इनोव्हा कारचा चक्काचूर !
सोलापूर : सोलापूर - हैद्राबाद मार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून चार चाकी गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. मृतात एका वर्षाच्या बाळाचा देखील समावेश आहे.
सोलापूर कृषी बाजार उत्पन्न समितीच्या परिसरात आज दुपारी ही अत्यंत भीषण आणि थरारक घटना घडली आहे. पुण्यावरून हुबळीकडे निघालेली इन्होवा कार उभ्या ट्रकला वेगाने धडकली आणि हा अपघात झाला. यात चार जण ठार झाले असून अन्य काही जखमी झाले आहेत. जखमीतील दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असतानाच मृतांची संख्या पाचवर गेली असल्याचे देखील सांगण्यात येऊ लागले आहे. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता देखील व्यक्त होऊ लागली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच्या रस्त्यावर एक मालट्रक (एम एच क्यू डब्लू ९५८७) हा उभा असताना पाठीमागून वेळाने आलेल्या इनोव्हा कारने ट्रकला जोरदार धडक दिली आणि हा अपघात घडला.
हा अपघात होताच प्रचंड आवाज झाला आणि चार जणांचा जागीच मृत्यू देखील झाला. इनोव्हा कारचा समोरचा भाग ट्रकच्या मागच्या बाजूला खाली आत घुसला असून चार चाकी गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. क्रेनची मदत घेवूनच ही कार बाजूला कारवाई लागली. मोठा आवाज होताच परिसरातील नागरिक घटनास्थळाकडे धावले. पोलीसही तातडीने घटनास्थळी आले असून जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मृतात लहान बाळ !
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यात एक पुरुष, दोन महिला आणि एका लहान बाळाचा समावेश असल्याचे सोलापूर शासकीय रुग्णालयातून सांगण्यात आले असून अन्य जखमीवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
अनियंत्रित वेग !
इनोव्हा गाडी अत्यंत वेगात होती आणि चालकाचे नियंत्रण राहिले नव्हते, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आल्यानंतर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून अत्यंत वेगाने कार धडकली आणि ट्रकच्या खाली घुसली त्यामुळे प्रवाशांना जोराचा मार लागला आणि यातच मृत्यू देखील झाले आहेत.
पाच जण ठार !
लाडू जाधव या एक वर्षाच्या बाळासह सचिन शितोळे (वय ३५), दिलीप जाधव (वय ३५), सोनाबाई जाधव (वय ५५) आणि गौरी जाधव (वय ७ ) अशा पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे तर वर्षा सचिन शितोळे, रेखा दिलीप जाधव, इशा जाधव, विनायक घोरपडे हे जखमी झाले आहेत.



0 Comments