google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धेत परिवर्तन फाऊंडेशन द्वितीय

Breaking News

राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धेत परिवर्तन फाऊंडेशन द्वितीय

 राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धेत परिवर्तन फाऊंडेशन द्वितीय

सांगोला (प्रतिनिधी): परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्येच माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे भिमसैनिक ग्रुप व रमामाता तरुण मंडळ अकलूज यांच्यातर्फे भव्य राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करून सामाजिक उपक्रम राबवून भीमजयंती साजरी करण्यात आली. 


यामध्ये राज्यभरातून विविध पथनाट्य संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यामध्ये सांगोला तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या संस्थांपैकी एक असणाऱ्या परिवर्तन फाऊंडेशन, सांगोला या संस्थेचा पथनाट्य संघ सुद्धा दाखल झाला होता. या संघाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळी या विषयीचे पथनाट्य सादर करून बाबासाहेबांचे सामाजिक कार्य जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला.


सदर स्पर्धेमध्ये परिवर्तन फाऊंडेशनने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या संघातील प्रज्ञा केंगार यांना उत्कृष्ट स्त्री अभिनय, नागनाथ साळवे यांना उत्कृष्ट पुरुष अभिनय व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पारितोषिकांनी गौरविण्यात. तसेच सर्वोत्कृष्ट वाद्य वादक पारितोषिक सुद्धा परिवर्तन फाऊंडेशनला मिळाले. सदर पथनाट्याची संहिता सुप्रसिद्ध लेखक सिद्धार्थ सोरटे सर (बारामती) यांनी लिहिली आहे. या स्पर्धेमध्ये संस्थेच्या संघामध्ये संस्थाध्यक्ष प.ओंकार साळुंखे, सदस्य प.महादेव मुजमुले, प.नागनाथ साळवे, सदस्या प.सेजल कवठेकर, प.प्रज्ञा केंगार, प.पुनम कोळी, प.प्रज्योती शिंदे, प.वैभवी शिंदे हे कलाकार सहभागी होते.


परिवर्तन फाऊंडेशनतर्फे प्रत्येक महान स्त्री-पुरुषांची वैचारिक जयंती साजरी केली जाते त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली. यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून महाड येथील संविधन प्रचारक श्री. नागेश जाधव सर  यांनी डॉ. बाबासाहेबांचे कार्य व संविधान याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना कोणत्याही महापुरुषांची जयंती ही मिरवणुकीत नाचून नव्हे तर त्यांचे विचार आत्मसात करून साजरी करावी. महिलांचा, दीन दुबळ्यांचा आदर करावा, वाईट मार्गांचा त्याग करून सत्कार्य करावे असे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी सर्वांना केले.

Post a Comment

0 Comments