google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : काँग्रेसला सोडून राष्ट्रवादी - शिवसेनेची आघाडी

Breaking News

सोलापूर : काँग्रेसला सोडून राष्ट्रवादी - शिवसेनेची आघाडी

 सोलापूर : काँग्रेसला सोडून राष्ट्रवादी - शिवसेनेची आघाडी

सोलापूर : काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्या. त्यानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस हाच मोठा भाऊ असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.त्या निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढली. त्या यशानंतर आत्मविश्वास वाढलेल्या नानाभाऊंनी राज्यभर दौरे केले. डिजिटल सदस्य नोंदणीच्या माध्यमातून त्यांनी पक्षाच्या ताकदीचा अंदाज घेतला.


दुसरीकडे विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा शेवटच्या क्षणी सुटणारा तिढा आता महापालिका, झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष कसा सोडविणार हा खरा प्रश्न आहे. त्यात सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही, यामुळे शक्यतो आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर होऊ शकतो. पण, काँग्रेसने जमवून न घेतल्यास शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित या निवडणुका लढू शकते, असाही अंदाज बांधला जात आहे.


पक्षाची खरी ताकद सामाजिक उपक्रम तथा कार्यक्रमात आणि आंदोलनावेळीच समजते. आंदोलनाच्या माध्यमातूनच पक्षाची ध्येय-धोरणे लोकांपर्यंत पोहचतात. त्यामुळे देशातील तथा राज्यातील विविध विषयांवर सातत्याने कोणता ना कोणता पक्ष आंदोलन करतोच. मागील काही दिवसांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम आदींनी सोलापूर दौरा केला.


त्यावेळी झालेल्या कार्यक्रमातील गर्दी पाहून शहरात आता काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष झाल्याचे अनेकांना वाटले. पण, ते नेतेमंडळी गेल्यानंतर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमाला किंवा आंदोलनाला वाढदिवसाला असते तेवढीही गर्दी नव्हती. गर्दी जमत नसल्याने शहरातील नेत्यांना काँग्रेस मनामनात अन्‌ घराघरात हा उपक्रम गुंडाळून ठेवावा लागला. ही बदलती हवा ओळखून काँग्रेसमधील माजी शहराध्यक्ष यांच्यासह दोन माजी महापौरांनी राष्ट्रवादीत उडी घेतली.


तर काही माजी नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. जनाधार नसलेल्यांना पदे दिल्याचा काहींनी आरोप केला असून अनेकजण शहर काँग्रेसमधील काही पदांवर इच्छुक आहेत.


 पण, त्यांना संधी मिळालेली नाही. अशा अंतर्गत गटबाजीमुळे आणि राष्ट्रवादीच्या डावपेचामुळे काँग्रेसला भाजपप्रमाणे 'मी पुन्हा येईन' अशी म्हणण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी चर्चा आहे. त्यासाठी काँग्रेसला आपली ताकद दाखवावी लागणार आहे. त्याशिवाय महापालिका निवडणुकीवेळी महाविकास आघाडीत पहिल्या नंबरचे स्थान भेटणे अशक्यच मानले जात आहे.


तर शिवसेना-राष्ट्रवादी येतील एकत्र

जिल्ह्यात प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या एकमेव आमदार असून पालकमंत्री राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामांसाठी पुरेसा निधी मिळत नाही. ही खंत अनेकांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर मांडली. पण, त्यावर काहीच तोडगा निघालेला नाही.


 राज्याच्या अर्थसंकल्पातही सर्वाधिक निधी राष्ट्रवादीलाच मिळाल्याचे सांगत नाराजांना हेरून राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी त्यांची पालकमंत्र्यांसोबत भेट घडवून आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचीही चर्चा आहे. जागा वाटपात काँग्रेसने जास्त ताठर भूमिका घेतल्यास शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढण्याची तयारीदेखील राष्ट्रवादीने सुरु केल्याचे बोलले जात आहे.


शहरात काँग्रेसची दुरावस्था

महागाईविरोधात ५ एप्रिलला शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी चार-पाच कार्यकर्ते सोडले तर केवळ पदाधिकारीच पहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी शहरातील महिला पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनातही अशीच आवस्था पहायला मिळाली. शहरातील काँग्रेसची आवस्था अशी झालेली असताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. 


तर दुसरीकडे आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे राज्याची जबाबदारी सोपविल्याने त्यांना सोलापूर शहर-जिल्ह्यासाठी पूर्णवेळ देता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तरीही, स्थानिक पदाधिकारी सन्मान न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढू, महापौर आमचाच अशा बाता मारीत आहेत, हे विशेष.

Post a Comment

0 Comments