google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा , उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

Breaking News

गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा , उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

 गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा , उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता तो जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. यामुळे सदावर्ते यांचा ताबा मिळवण्यासाठी मुंबईत आलेल्या पुणे पोलिसांना माघारी जावे लागणार आहे.

मुंबई/पुणे - पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयाने  दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्ते यांचा अटकपूर्व जामीन अर्ज 25 हजारांच्या जातमुचलक्यासह काही अटी व शर्तीने मंजूर केला आहे.


छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात एका वृत्तवाहिनीवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात  अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी ताबा मिळावा यासाठी पुणे पोलीस  मुंबईत आले होते. सोमवारी रात्रीच आर्थर रोड कारागृह प्रशासनाकडे सदावर्ते यांचा ताबा मिळण्याबाबत अर्ज केला होता. त्याविरोधात सदावर्ते यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.


याप्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सदावर्तेंचा अटकपूर्व जामीन मंजूर केला  आहे. न्यायालयाने 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, सदावर्ते यांना पुण्याच्या प्रकरणातून अटक होणार नाही. मात्र, इतर प्रकरणात ते कोठडीत असतील. त्या प्रकरणांमधून त्यांना जामीन मिळणार नाही तोपर्यंत त्यांना कारागृहातच राहावे लागेल.


शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला घडवून आणल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सध्या सदावर्ते न्यायालयीन कोठडीत असून ते उपोषण करत असल्याची माहिती मंगळवारी (दि. 26 एप्रिल) सरकारी वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाच्या युक्तिवादाला दरम्यान देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments