google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नवरदेव बसला नाचत, नवरीने उरकले दुसऱ्याशी लग्न !

Breaking News

नवरदेव बसला नाचत, नवरीने उरकले दुसऱ्याशी लग्न !

 नवरदेव बसला नाचत, नवरीने उरकले दुसऱ्याशी लग्न !

 नवरदेव पारण्याला गेला आणि तिकडेच डी जे च्या तालावर नाचत बसला, अखेर मंडपात कंटाळलेल्या नवरीने दुसऱ्याच मुलाबरोबर लग्न केलं आणि नवरदेवाला रिकाम्या हाती मंडपातून परतावे लागल्याचे अफलातून घटना घडली आहे.


विवाह हा आनंददायी आणि मंगल सोहळा असतो त्यामुळे मोठ्या हौसेने विवाह सोहळे संपन्न होत असतात, पाहुणे मंडळी वेळ काढून लग्न सोहळ्यास उपस्थित राहतात तसे नवरदेवाचे मित्र देखील मोठ्या संख्येने आणि त्यापेक्षाही अधिक उत्साहात लग्नमंडपात आणि नवरदेवाच्या आजूबाजूला वावरत असतात. 


लग्न जेंव्हा निश्चित केले जाते तेंव्हा मुहूर्त शोधला जातो, विवाहाची तारीख आणि नेमका वेळ देखील काढला जातो आणि तो जसाच्या तसा निमंत्रण पत्रिकेवर छापला जातो. पाहुणे, मित्रमंडळी घाई करून विवाहस्थळ शोधत विवाहस्थळी पोहोचत असतात पण दिलेल्या वेळेत बहुतेक लग्न लागत नाहीत आणि पाहुण्यांना अकारण ताटकळत बसावे लागते. लग्नास आलेल्या मंडळीना दुसरीही काही कामे असतात अथवा आणखी दुसऱ्या एखाद्या विवाह सोहळ्यास जायचे असते पण लग्न काही वेळेत लागत नाही असा अनुभव बहुतेक विवाह सोहळ्यात येत असतो. 


लग्नाची सगळी तयारी झालेली असते पण घोड्यावर बसून पारण्याला गेलेला नवरदेव लवकर परत येतच नाही, डी जे च्या तालावर नवरदेवाचे मित्र मद्यपान करून नाचत आपली हौस भागवून घेत असतात, जणू काही हा कार्यक्रम लग्नाचा नसून यांच्या नाचण्यासाठीच ठेवलेला असतो ! घोड्यावर बसलेला नवरदेव देखील या आनंदात सहभागी असतो पण अशा एका नवरदेवाला असे नाचणे भलतेच महागात पडले आहे. सिंदखेड राजा येथे नवरदेव नाचण्याचा आनंद घेत राहिला आणि तिकडे मंडपात नवरीने दुसऱ्या मुलासोबत लग्न देखील उरकले आणि नवरा जेंव्हा मंडपात परतला तेंव्हा नवरीचे लग्न दुसऱ्या कुणाबरोबर तरी झाल्याचे त्याला दिसले तेंव्हा धक्का सहन करण्याशिवाय त्याच्या हातात काहीच उरले नव्हते. 


उशिराने मंडपात दाखल !

मलकापूर पांग्रा येथील एक मुलीचा विवाह कंडारी येथील तरुणासोबत निश्चित करण्यात आला होता त्यानुसार लग्न मंडपात मुलाकडील मंडळी आधी पोहोचणे अपेक्षित होते पण तसे घडले नाही. नवरीचे वऱ्हाड मंडपात दाखल झाले तरी नवरदेवाचे बिऱ्हाड आलेले नव्हते, त्यांना उशीर झाल्यामुळे पुढच्या सगळ्याच विधीला आधीच उशीर झालेला होता त्यामुळे मुलीकडील सगळेच वैतागून गेलेले होते.वऱ्हाडासह नवरीही ताटकळली !


सजलेला नवरोबा पारण्यासाठी गेला आणि इकडे मंडपात वऱ्हाडी मंडळी आणि नवरीही कंटाळली, नवरदेव काही केल्या परत येण्याचे नाव घेत नव्हता. काही मंडळीनी अंदाज घेतला असता नवरदेवाचे मित्र बेधुंद होऊन डी जे च्या तालावर तिकडेच नाचण्यात गुंग झाल्याचे दिसत होते. लग्नाची वेळ होऊन गेल्याचे सांगूनही कुणी ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. मंडपात एकच अस्वस्थता पसरली होती.  एकूण परिस्थिती पाहता लग्न किमान पाच तास तरी उशिरा लागेल असे चिन्ह स्पष्ट झाले होते. 


आणि लग्न उरकले !

पारण्याला गेलेला नवरदेव काही केल्या येतच नाही हे पाहून आधी वैतागलेले आणि नंतर चिडलेले वऱ्हाडी आता हे सगळे सहन करण्याच्या पलीकडे गेले होते. त्यांनी सरळ लग्नाला आलेल्या एका मुलाला तयार केले आणि नवरीचे लग्न त्याच्याशी लावून देखील दिले. तिकडे डी जे च्या तालावर नवरदेव नाचण्यात रमला होता आणि इकडे मंडपात लग्नसोहळा सुरु झाला होता. नवरीने दुसऱ्याच मुलाच्या गळ्यात वरमाला घातली तरी याचा डी जे काही थांबला नव्हता. 


रिकामे परतावे लागले !

डी जे च्या तालावर नाचून नाचून दमलेले सगळे नवरदेवाला घेवून मंडपात आले तेंव्हा त्यांना हा प्रकार दिसला. त्यानंतर दोन्ही पक्षात वादावादी झाली पण आता वाद घालून देखील काही उपयोग नव्हता. अखेर लग्नमंडपातून नवरदेवाला रिकाम्या हाती परत जावे लागले आणि नवरी दुसऱ्याच मुलासोबत लग्न करून त्याच्यासोबत गेली! ऐनवेळी अनेक कारणांनी लग्न मोडतात पण अशा प्रकारची घटना ही मात्र पहिल्यांदाच घडली असावी

Post a Comment

0 Comments