मुलींच्या समोरच पत्नीचा गळा चिरून खून!
चाकण: चाकण जवळील मेदनकरवाडी बापदेववस्ती येथे आज पहाटे खळबळजनक घटना घडली. एका व्यक्तीने आपल्या मुलींच्या समोरच पत्नीचा चाकूने गळा चिरून खून केला. संशयीत आरोपी पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पत्नी गाढ झोपेत असताना तिच्या गळ्यावर वार करून पतीने तिचा खून केला. सचिन रंगनाथ काळेल असे संशयीत आरोपीचे नाव असून तो फरार झाला आहे.
अश्विनी सचिन काळेल असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. चाकण जवळील मेदनकरवाडी येथे एका इमारतीत काळेल कुटुंब भाड्याने राहात होते. संशयित आरोपी सचिन हा एका कंपनीत कामाल होता. तर, पत्नी अश्विनी दोन दिवसांपासून कामाला जात होती. परंतु, सचिन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास सचिनने गाढ झोपेत असलेल्या पत्नीचा आपल्या मुलींच्या समोरच सुरुवातीला गळा आवळून आणि मग चाकूने वार करून खून केला.
घटनेनंतर त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला घरातच ठेवून तीन लहान मुलींना शेजारील इमारतीत राहत असलेल्या आपल्या भावाच्या घरी नेऊन सोडले. त्यानंतर त्याने चाकण मधून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
चाकण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असून, पती सचिन याच्या शोधासाठी चाकण पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.दरम्यान, पोलिसांनी ज्या लहान मुलींच्या समोर खुनाची घटना घडल्याची त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments