Breaking News

अनाथ सुंदरी बनली पोलीस उपनिरीक्षक; अनाथाच्या कोट्यातील PSI झालेली पहिलीच कन्या

 अनाथ सुंदरी बनली पोलीस उपनिरीक्षक;

अनाथाच्या कोट्यातील PSI झालेली पहिलीच कन्या

लोणावळा : एका अनाथ तरुणीच्या संघर्षाला यश मिळाले असून, तिची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. सुंदरी एस. बी. असे तिचे नाव असून, पहिल्याच प्रयत्नात अनाथ मुलांच्या कोट्यातून तिची निवड झाली आहे. नुकत्याच लागलेल्या राज्य सेवा परीक्षेच्या निकालातून तिच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.


     सुंदरी वयाच्या तिसऱ्या वर्षी पुणे जिल्ह्यातील मळवली येथील संपर्क बालग्राम या संस्थेत दाखल झाली होती. या संस्थेत ती बारावीपर्यंत राहिली. तिथेच तिचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर स्वप्ने पूर्ण करण्याचे ध्येय घेऊन ती या संस्थेतून बाहेर पडली, लोणावळ्याजवळील अभियांत्रिकी महाविद्यालयात कम्प्युटर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी तिने प्रवेश घेतला. मात्र, हे शिक्षण पूर्ण करणे तिच्यासाठी सोपे नव्हते. आर्थिक भार तिलाच उचलावा लागणार होता. त्यामुळे तिने महाविद्यालयातील कम्प्युटर लॅबमध्ये सहायकपदी नोकरी पत्करली. या वेतनातून तिने महाविद्यालयाची फी भरून शिक्षण पूर्ण केले.


    शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी शाखेतील नोकरी निवडण्याऐवजी तिने सरकारी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. तिने 2018 मध्ये राज्य सेवा कम्बाइन ग्रुप बी या स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज भरला. 2019 मध्ये झालेल्या या परीक्षेत तिला यश मिळाले. मात्र त्यानंतर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत या स्पर्धा परीक्षेची प्रक्रिया लांबली. परिणामी तिची निवड होण्यासाठी 2022 उजाडले. सनाथ वेल्फेअर फाउंडेशन या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने मदत केल्याने हे शक्य झाल्याचे तिने आवर्जून नमूद केले. पहिल्याच प्रयत्नात तीने हे यश मिळविले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अनाथ मुलांच्या कोट्यातून पोलीस उपनिरीक्षक बनलेली ती पहिलीच कन्या असल्याने सर्व स्तरातून तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


महिला बालकल्याण अधिकारी बनायचंय - सुंदरी

या यशाविषयी बोलताना सुंदरी म्हणाली, मी पोलीस उपनिरीक्षक झाले याचा आनंद आहेच, परंतु केवळ या पदावर समाधान न मानता मी महिला व बालकल्याण विभाग अधिकारी होण्याचे ध्येय बाळगले आहे. त्याकरिता तयारी करणार आहे.

Post a Comment

0 Comments