सोलापूर : बार्शी येथे बसस्थानक चौकात महिलांचा राडा
बार्शी : महिला दिनादिवशी महिलांच्या भावना दुखावल्या, मानहानी केल्याप्रकरणी बार्शी व मुंबई येथे ॲट्रासिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस या संशयितास घेऊन जात असताना बसस्थानक चौकात महिला व तृतियपंथियांनी शुक्रवारी (ता.१८) राडा करत चोळी-बांगडीचा आहेर संशयितास देण्याचा प्रयत्न केला.या प्रकारामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प होती.
काँग्रेस पक्षाचे तत्कालिन बार्शी शहर अध्यक्ष ॲड.जीवनदत्त आरगडे यांनी नुकत्याच झालेल्या महिला दिनादिवशी दिव्यांग महिलेस सोशल मिडियावर लज्जास्पद पोस्ट टाकून भावना दुखावल्या होत्या. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर काही महिला मुंबई येथे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व ना.बच्चू कडू यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या.
तेथेही या संशयिताने महिलांना अपशब्द वापरल्यावरून महिलांनी मरिनड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.मुंबई पोलिसांनी ॲड.आरगडे यास अटक करुन त्याची ऑर्थर रोड तुरुंगात रवानगी केली होती. दरम्यान बार्शी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबई येथून गुरुवारी रात्री आरगडे यांस बार्शी येथे आणले होते. रात्री उशिरापर्यंत तपास करुन त्याचा मोबाईल पंचनामा करुन जप्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी (ता.१८) सकाळी आरगडे यास सोलापूर येथील विशेष दिव्यांग न्यायालयात उभे करण्यासाठी पोलिस वाहनातून घेऊन जात असताना पोलिसांचे वाहन बसस्थानक चौकात आले असता रणरागिणींनी तसेच तृतियपंथियांनी पोलिसांचे वाहन अडवले. या संशयितास चोळी व बांगडी देण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती तर वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलिस बंदोबस्त बोलावून स्थिती आटोक्यात आणली. तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.
0 Comments