महावितरणने शेतकऱ्याला दिले तेहतीस लाखांचे बिल !
खेड : महावितरणने दिलेल्या चुकीच्या अनेक बिलांचे बिंग फुटत असताना सायगाव येथील एका शेतकऱ्यास तब्बल ३३ लाखांचे बिल दिले असून हे बिल पाहून शेतकरी घामाघूम झाल्याचे दिसत आहे.
महावितरणकडून चुकीची आणि अवाजवी बिले दिली जात असल्याबाबत राज्यभरातून मोठ्या तक्रारी आहेत. आधी चुकीची बिले द्यायची आणि तक्रार केली की 'आधी बिल भरा, मग दुरुस्तीचे पाहू' हेच ऐकून घ्यावे लागत होते. प्रंचड रकमेची आणि अवाजवी बिले (Incorrect electricity bill) आली की ती भरली जात नाहीत आणि महावितरण पुन्हा थकबाकीचे मोठे आकडे सांगत सुटलेले असते. या तक्रारी वाढल्यानंतर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका मांडल्यानंतर राज्यातील प्रत्येक तालुक्यात चुकीची वीज बिले दुरुस्त करून देण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहेत आणि या मोहिमेत महावितरणकडून कशा प्रकारे चुकीची बिले देण्यात आली आहेत हे देखील चव्हाट्यावर येताना दिसत आहे. कागल येथील एका शेतकऱ्यास एक लाखाहून अधिक रकमेचे बिल देण्यात आले होते, त्याची दुरुस्ती झाल्यानंतर या शेतकऱ्याकडे केवळ दोन हजाराचे बिल असल्याचे स्पष्ट झाले होते.
चुकीच्या बिलाची राज्यभर मोठी चर्चा असताना आणि अशी बिले दुरुस्त करून दिली जात असताना पुणे जिह्यातील खेड तालुक्यातील सुमाकांत पंढरीनाथ काळे या शेतकऱ्यास फेब्रुवारी महिन्यात ३३ लाख ३८ हजार ६९० रुपयांचे कृषी पंपाचे बिल देण्यात आले आहे. एवढे मोठे बिल पाहून या शेतकऱ्यास अक्षरश: घाम फुटला आहे. काळे हे गरीब शेतकरी आहेत आणि त्यांना आलेले लाखो रुपयांचे बिल त्यांना धडकी भरविणारे ठरू लागले आहे. शेतकरी काळे आणि महावितरण यांच्यात बिलांचे एक गूढ सुरु असून त्यांच्याबाबत घडलेला हा काही पहिला प्रकार नाही. या आधीही त्यांना अशाच प्रकारे महावितरणने 'शॉक' दिलेला असल्याची माहिती समोर येत आहे.
सायगाव येथील शेतकरी सुमाकांत काळे यांनी मार्च २०१३ मध्ये सात हजार सातशे रुपये भरून साडे सात एचपी चे नवे कनेक्शन घेतले आणि त्यानंतर त्यांना दोन वर्षांनी तब्बल ९९ लाख रुपयांचे वीज बिल देण्यात आले होते . एवढे मोठे बिल पाहून त्यांना धक्का बसला आणि त्यांनी महावितरण कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी महावितरणने त्यांचे बिल परत घेतले. गरीब शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे असे वाटत असतानाच पुनः ऑगष्ट २०१९ मध्ये त्यांना विद्युत बिल देण्यात आले आणि या बिलावर चक्क १ कोटी १८ लाख ३८ हजार ७९० रुपये दाखविण्यात आले होते. त्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा नवे बिल देण्यात आले आणि कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.
वीज पुरवठा खंडित केल्याने या शेतकऱ्याने २५ हजार रुपये जमा केल्यानंतर त्यांचा वीज पुरवठा पुन्हा जोडला गेला पण बिलाची रक्कम कमी करण्याची तयारी वीज कंपनीने दाखवली नाही. या बिलाचे घोंगडे भिजत पडले आणि आता त्यांना ३३ लाख ३८ हजार ६९० रुपयांचे विजेचे बिल आले आहे. संताप वक्त करण्यापलीकडे या गरीब शेतकऱ्याच्या हातात काहीच उरले नाही. त्यांच्या या अवाढव्य बिलाची मात्र सगळीकडेच चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान राज्यात प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालूक्यात चुकीची अथवा अवाजवी असलेली बिले दुरुस्त करून शेतकरी बांधवाना दिली जात आहेत आणि यावेळी अनेक शेतकऱ्यांना अवाजवी बिले देण्यात आल्याचे दिसून आले आहे.
0 Comments