Breaking News

दुसरीच्या विद्यार्थ्यांना मराठी सोबत इंग्रजी शब्दांचा वापर अनिवार्य : शिक्षणमंत्र्यांची घोषणा

 दुसरीच्या विद्यार्थ्यांना मराठी सोबत इंग्रजी शब्दांचा वापर अनिवार्य : शिक्षणमंत्र्यांची घोषणा

मुलांना मराठी भाषेसह जागतिक स्तरावर शिक्षण घेण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान व्हावे, या उद्देशाने इयत्ता पहिलीप्रमाणेच दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकात मराठीसह इंग्रजी शब्दांचा समावेश करण्यात येणार आहे.शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा काशी मिरा येथे मंगळवारी केली.


राज्यातील आदर्श शाळांमध्ये ही योजना राबवण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या. राज्यातील ४८८ आदर्श शाळांमध्ये शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा शुभारंभ महिलादिनी त्यांच्या हस्ते पालिकेच्या काशी गावातील शाळेत केला.शाळांत गुणवत्तार्शैक्षणिक दर्जा वाढीसाठी शिक्षण विभागाकडून विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने योजना राबवल्या जाणार आहेत. यासाठी राज्यातील ४८८ आदर्श शाळांची निवड करण्यात आली आहे. या आदर्श शाळांमध्ये मिरा-भाईंदर पालिकेच्या काशी गावातील शाळेचा समावेश आहे. या वेळी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आमदार गीता जैन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक विशाल सोळंकी, एम. डी. सिंह, आयुक्त दिलीप ढोले आदी उपस्थित होते.


कोरोना काळात मुले ऑनलार्इन पद्धतीने शिकत होती. या काळात विद्यार्थ्यांना आलेल्या समस्या मांडण्यासाठी शाळांत समिती स्थापन केली जाईल. या समितीत आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, शिक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असतील. ही समिती विद्यार्थ्यांशी चर्चा करतील आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतील. क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या स्मृतिदिनानिमित्त १० मार्चपासून हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.


विविध योजना ४८८ आदर्श शाळांसाठी सुरू केलेल्या योजनांत विद्यार्थ्यांसाठी ई-साहित्य, ग्रंथालय, उद्योजकता विकास मार्गदर्शन, शाळांची फेरबांधणी, स्वच्छतागृहे, आरोग्य शिबिर, बालवाडी व अंगणवाडीसाठी शाळापूर्व तयारी अभियान, लघु शिष्यवृत्ती, विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा, स्वसंरक्षण, चांगल्या व वाईट स्पर्शाचे ज्ञान अशा विविध योजनांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments