Breaking News

शिक्षकाची आत्महत्या नव्हे, बायकोनेच काढला काटा !

 शिक्षकाची आत्महत्या नव्हे, बायकोनेच काढला काटा !

मंगळवेढा : शिवणगी येथे शिक्षकाची आत्महत्या नव्हे तर बायकोनेच आपल्या प्रियकराच्या साथीने पतीचा काटा काढला असल्याचे उघडकीस आले आहे. 


काल सकाळी सत्यवान कांबळे या तरुण शिक्षकाची गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यावर मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली होती. शिक्षकाची पत्नी करीत असलेला आक्रोश ऐकून अनेकांच्या हृदयाला पील पडत होता पण एका दिवसात सत्य बाहेर आले आणि शिक्षकाच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या साथीने गळा आवळून शिक्षकाचा खून केला आणि आत्महत्येचा बनाव करण्यासाठी मृतदेह फासावर लटकावला असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. आपल्या अनेतिक प्रेम प्रकरणास अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या साथीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक देखील केली आहे.


सत्यवान कांबळे यांच्या पत्नीचे सांगलीच्या प्रशांत अशोक पवार याच्याशी अनैतिक संबध होते. या प्रकरणात पती सत्यवान यांचा अडथळा येत असल्याचा राग पत्नीच्या मनात होता त्यामुळे तिने आपल्याच तरुण पतीचा काटा काढण्याचे कारस्थान रचले आणि सांगलीच्या शाहरुख रफिक शेख आणि मिरज येथील अजय परशुराम घाडगे  यांनी सत्यवान याचा घरी झोपलेले असताना दोरीने गळा आवळून त्यांचा जीव घेतला. सत्यवान यांचा खून करून कुणाला शंका येऊ नये यासाठी मृतदेह पंख्याला टांगण्यात आला.  सत्यवान कांबळे यांनी आत्महत्या केल्याचा आभास निर्माण केला आणि शाहरुख, अजय हे निघून गेले. सकाळी पत्नीने आक्रोश सुरु केला आणि पतीने आत्महत्या केली असल्याचे सांगू लागली.


कितीही हुशारीने गुन्हा केला तरी सत्य आपोआप बाहेर येते असा प्रकार पुन्हा एकदा या प्रकरणात दिसून आले. सांगलीचे गुन्हा अन्वेषण पथक तिथल्या एका दुहेरी खून प्रकरणाचा तपास करीत असताना त्यांना सांगली - मिरज रस्त्यावर तानंग फाटा येथे तिघे जण आढळून आले. पोलिसांना त्यांच्याकडे पाहून संशय आला म्हणून त्यांना सहज हटकले. आपण मंगलावेढा तालुक्यात केलेला खून पोलिसांना समजला असावा अशी खात्री आरोपींची झाली आणि अजय याने घाबरून  स्वत:च सगळा प्रकार सांगून या खुनाची कबुली देखील दिली . 


आरोपींनी दिलेल्या माहितीवरून सांगली पोलिसांनी लगेच मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधला आणि आरोपीबाबत माहिती दिली. बायकोनेच शिक्षक पतीचा काटा काढून आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचे उघडकीस येताच मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली. मंगळवेढा पोलिसांनी मयत शिक्षकाची पत्नी आणि अन्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पत्नीच्याच कारस्थानाने नवऱ्याचा काटा काढण्यात आल्याची चर्चा तालुकाभर पसरली आणि प्रत्येकाला धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments