विना रेशनकार्ड मिळणार स्वस्त धान्य, मोदी सरकारची संसदेत मोठी घोषणा…!
रेशनकार्ड अर्थात शिधापत्रिका.. स्वस्त धान्य दुकानातून जीवनाश्यक वस्तू वा शिधा मिळविण्यासाठी सार्वजनिक वितरण योजनेमार्फत पुरवला जाणारा एक महत्वाचा दस्ताऐवज. कोणतेही सरकारी काम असो, रेशनकार्डची मागणी केली जातेच.
सध्या देशात केंद्र सरकारतर्फे ‘वन नेशन-वन रेशन’ उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाद्वारे आतापर्यंत देशातील 77 कोटी लोकांना एकत्र जोडण्यात आलंय. त्यात रेशनकार्ड वापरणाऱ्यांची संख्या आहे, तब्बल 96.8 टक्के… त्यात 35 राज्ये नि केंद्रशासित प्रदेशातील लोकांचाही समावेश असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते..
दरम्यान, आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानातून धान्य घ्यायचे झाले, तर नागरिकांना सोबत रेशनकार्ड ठेवावं लागत होतं. दुकानदाराला रेशनकार्ड दाखविल्यानंतरच धान्य मिळत होतं. मात्र, आता मोदी सरकारने रेशन कार्डधारकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. याबाबतची घोषणा नुकतीच केंद्र सरकारतर्फे संसदेत करण्यात आली..
विना रेशनकार्ड धान्य मिळणार…
केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, आता स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेताना, रेशनकार्ड सोबत ठेवण्याची गरज नाही. विना रेशनकार्डचे आता नागरिकांना धान्य दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी दिली..
रेशनकार्ड प्रक्रिया अधिक सोपी केल्याचे सांगून पियुष गोयल म्हणाले, की “आतापर्यंत धान्य घेताना नागरिकांना दुकानदाराला रेशनकार्ड दाखवावं लागत होतं. परंतु, आता त्याची गरज नाही. रेशन कार्डधारकांनी आता दुकानदारांना फक्त रेशन कार्ड नंबर व आधार नंबर सांगितला, तरी लाभार्थी कुटुंबांना सहज रेशन दिले जाणार आहे..!”
रेशनकार्डधारकांची दुसरीही एक महत्वाची अडचण केंद्र सरकारने दूर केलीय.. ती म्हणजे, कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त अनेकांना दुसऱ्या शहरात किंवा परराज्यात जाण्याची वेळ येते. अशा वेळी या नागरिकांचे रेशनकार्ड मूळ गावी असल्याने, नव्या ठिकाणी स्वस्त धान्य घेता येत नव्हते. मात्र, आता तसे होणार नाही.
एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबासह दुसऱ्या शहरात राहत असेल नि त्याचे रेशनकार्ड मूळ गावी असले, तरी रेशनकार्ड नंबर व आधार नंबर सांगून देशातील कोणत्याही दुकानातून सहज रेशन मिळणार आहे. त्यासाठी मूळ रेशनकार्ड दाखवण्याची गरज नाही, असेही केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितलं..
0 Comments