भूकंपाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा सोलापुरात कायान्वित !
सोलापूर : भूकंपाची पूर्व सूचना देणारी यंत्रणा सोलापुरात कार्यान्वित करण्यात आली असून ही यंत्रणा भूकंप होण्याच्या आधी पंधरा दिवस सूचना देणार असून याचा लाभ सभोवतालच्या पाचशे किमी अंतरासाठी होणार आहे.
भूकंपाचे संकट नेहमी अचानक येथे आणि ते कळायच्या आधीच मोठा विनाश घडलेला असतो. भूकंप होण्यापूर्वी कसलीच सूचना मिळत नाही त्यामुळे सावधगिरीच्या उपाययोजनाही करण्यात येत नाहीत त्यामुळे शेकडो हजारो लोक भूकंपात मृत्युमुखी पडतात आणि मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त होत असतात. आता मात्र भूकंप होणार असल्याची सूचना पंधरा दिवस आधीच मिळणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर
विद्यापीठाच्या आवारात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेचा लाभ सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, पुणे, नगर, सांगली कोल्हापूर अशा जिल्ह्यांना होणार असून ५०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या परिसराची सूचना प्राप्त होणार आहे.
'रेडॉन जिओ स्टेशन' असे या केंद्राचे नाव असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि भाभा परमाणु अनुसंधान केंद्र यांच्यात याआधीच सामंजस्य करार झालेला असल्यमुळे संशोधनासाठी आणि परिसरातील भूकंपाची माहिती लोकांना मिळण्यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर उपकरण जमिनीत तीन फुट खोल बसविण्यात आले असून या उपकरणाची यंत्रणा ही सौर उर्जेवर चालत आहे.
जमिनीत भूकंपाच्या हालचाली सुरु होतात तेंव्हा हे उपकरण रेडॉन उत्सर्जन मोजू लागते त्यामुळे भूकंपपूर्व क्रिया होण्याच्या आधीच पाण्याच्या झऱ्यात रेडॉनचे प्रमाण वाढले असल्याचे आधीच दिसून येते. त्यानुसार सदर उपकरण रेडॉन शोधून काढून यंत्रणेला सिग्नल पाठवला जातो आणि जमिनीत भूकंपाच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती यंत्रणेकडून मिळते. या यंत्रणेमुळे भूकंपामुळे होणारे नुकसान आणि जीवितहानी टाळता येवू शकते.
0 Comments