Breaking News

देशातली सर्वात लहान महिला आयपीएस : नितीशा

 देशातली सर्वात लहान महिला आयपीएस : नितीशा


उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातल्या भातगळी इथल्या नितीशाचा लोहारावासीयांना अभिमान वाटत आहे . अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या नितीशाचं कुटुंब मूळचं भातगळीचं . नोकरीव्यवसायानिमित्त हे कुटुंब पुढे लातूरला स्थायिक झालं .


 माणसाच्या प्रगतीसाठी , सक्षमीकरणासाठी शिक्षण हेच माध्यम आहे , यावर नितीशाचे आईवडील संजय आणि अश्विनी यांचा ठाम विश्वास . त्यामुळे सुरुवातीपासून त्यांचं संपूर्ण प्राधान्य नितीशा आणि तिच्या बहिणीच्या शिक्षणाला होतं . त्यातूनच नितीशा सहाव्या वर्षांपासून आई व बहिणीसोबत पुण्यात राह लागली .


" देशातली सर्वात लहान महिला आयपीएस म्हणून आज नितीशाचं कौतुक होत आहे , पण तिचा हा प्रवास सोपा नव्हता . ” अश्विनी जगताप सांगत होत्या . नितीशा लहानपणापासूनच अभ्यासू , हुशार जिद्दी . १० वी नंतर विज्ञान शाखेला प्रवेश घेतला पण ११ वी संपतासंपताच मानव्य आणि सामाजिक विज्ञान शाखांची अधिक आवड असल्याची जाणीव झाली . 


१२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर जेईई मेन्समध्ये अपयश आल्यावर मात्र कला शाखेकडे जाण्याचं निश्चित झालं . आईबाबांनी तिचा निर्णय अत्यंत सहजतेनं स्वीकारला ." यशाकडे कसं बघायचं ते कोणाला सांगावं लागत नाही . पण अपयशाकडे कसं बघायचं हे मात्र लहानपणापासून शिकवावं लागतं .


 ” अश्विनीताई सांगत होत्या . " " आजच्या काळाचा , मुलांच्या भावविश्वाचा विचार केला तर मुलांना अपयशाकडे सकारात्मक दृष्टीनं बघायला शिकवणं खूपच आवश्यक आहे . शिवाय प्रत्येक कठीण काळात आम्ही तुझ्यासोबत आहोत , हा विश्वास मुलांना द्यायला हवा . अपयश कितीही मोठं असलं तरी आपण मिळून ते पुसू आणि परत यशाचा प्रयत्न करू , हा विश्वास मिळाला की मुलांना एकटं वाटत नाही . 


ती कुठल्याही अडचणीवर , मात करू शकतात . ” नितीशानं मग कॉलेज सुरू असतानाच यूपीएससीसाठी तयारी सुरू केली . आईमुळे वृत्तपत्र , सीएसआर , मनोरमा वाचण्याची सवय आणि आवड होतीच . शाखेच्या विषयांची जोड मिळाली . व्यवस्थेत राहून समाजातल्या गरजू लोकांना मदत करण्याच्या इच्छेतून प्रशासकीय सेवेसाठी तिने प्रयत्न सुरू केले . 


हे सुरू असतानाच फर्ग्युसन महाविद्यालयातून ती बीए ( सायकॉलॉजी ) झाली . सप्टेंबर २०२१ मध्ये नागरी सेवा परीक्षेत देशात १ ९९ व्या क्रमांकानं ती उत्तीर्ण झाली . सध्या मसुरीत तिचं प्रशिक्षण सुरू असून हैदराबाद इथल्या नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये २६ मार्चपासून वर्षभराचं प्रशिक्षण सुरू होईल .

Post a Comment

0 Comments