सोलापूर जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरु !
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा सोमवारपासून सुरु होत असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय आज घेण्यात आला आहे.
कोरोनाची तिसरी लाट प्रबळ होण्याची भीतीने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रभाव कमी होत चालल्याचे दिसताच राज्य शासनाने शाळा सुरु करण्यास अनुमती दिली परंतु स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन निर्णय घेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपविण्यात आली होती. राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या होत्या
पण सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने निर्णय पुढे पुढे जात होता पण आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठक झाली आणि या बैठकीत जिल्ह्यातील सर्व शाळा सोमवार दि. ७ फेब्रुवारी पासून पहिली ते बारावी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण कमी होत असून पालकांची शाळा सुरु करण्याबाबत असलेली मागणी विचारात घेण्यात आली आहे. शाळेत जाणाऱ्या पाल्यांच्या पालकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे
शिवाय घरातील सर्वांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे अशा सूचना देखील देण्यात येणार आहेत. या बैठकीत सुरुवातीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन प्रांताधिकारी यांची शाळा सुरु करण्याबाबतची मते जाणून घेतली. शाळा सुरु करण्याबाबत पालकातून मागणी होत आहे
शिवाय पंढरपूर, बार्शी, माळशिरस तालुके वगळता अन्य तालुक्यात रुग्णांची संख्या कमी होत आहे त्यामुळे शाळा सुरु करण्यास हरकत नसल्याचे मत प्रांताधिकारी यांनी नोंदवले. त्यानुसार कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही बैठक संपन्न झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, पोलीस उपयुक्त दीपक आर्वे, पोलीस उपाधीक्षक सुर्यकांत पाटील, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर आदी अधिकारी उपस्थित होते.
0 Comments