चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून ; पतीस अटक
टेंभुर्णी : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला शिविगाळ करून कोणत्या तरी धारदार शस्त्राने छातीच्या उजव्याबाजूस वार करून तिला गंभीर जखमी केले. पुढील उपचारासाठी सोलापूरला घेऊन गेले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
माढा तालुक्यातील दहिवली येथे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात पतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास टेंभुर्णी पोलीसांनी अटक केली आहे.
आश्विनी सुनिल पोटरे ( वय- 30 रा. दहिवली ता. माढा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रघुनाथ चांगदेव पोटरे( वय- 31 रा.दहिवली)याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पती सुनिल चांगदेव पोटरे ( रा. दहिवली ता. माढा) यास पोलीसांनी अटक केली आहे. या विषयी पोलीसांकडून समजलेली अधिक माहिती अशी ,
रघुनाथ पोटरे हे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जर्शी गायींच्या धारा काढत असताना त्याचा सख्खा भाऊ सुनिल पोटरे याच्या घरातून बाईच्या ओरडण्याचा जोराचा आवाज आला. त्यामुळे हातातील काम टाकून रघुनाथ पोटरे त्याची पत्नी मनिषा तसेच भाऊ अनिल त्याची पत्नी गोकुळा असे सर्वजण सुनिलच्या घराकडे धावत आले.
घराच्या दरवाजाला आतून कडी लावलेली होती. सुनिलची पत्नी ओरडत होती तर सुनिल तिला शिवीगाळ करीत मारहाण करीत असल्याचा आवाज येत होता. रघुनाथ व इतर लोक सुनिलला दरवाजा उघड म्हणत होते परंतू सुनिल दरवाजा उघडत नव्हता त्यामुळे शेडच्या बाजूचा पत्रा उचकटून सर्वजण आत गेले.
सुनिलला पत्नी आश्विनीच्या अंगावरून बाजूला ओढले. त्यावेळी आश्विनीच्या छातीच्या उजव्याबाजूकडुन भरपूर रक्तस्त्राव होत असल्याने शेजारी रहाणार्या जगन्नाथ याच्या चारचाकी वाहनातून टेंभुर्णी येथे उपचारासाठी हलविले. परंतू रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होत
असल्याने पुढील उपचारासाठी ताबडतोब सोलापूरला घेऊन गेले. परंतू उपचारापूर्वीच आश्विनीचा मृत्यू झाला. मयत आश्विनी हिला मुलगी वैश्णवी व मुलगा शुभम ही दोन मुलं आहेत. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी ओमासे करीत आहेत.
0 Comments