google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : सेवानिवृत्त चालकांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग

Breaking News

सोलापूर : सेवानिवृत्त चालकांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग

 सोलापूर : सेवानिवृत्त चालकांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग


सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण करावे या मुख्य मागणीसाठी मागील दोन महिन्यांपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने सेवानिवृत्त झालेल्या चालकांच्या आता एसटीचे स्टेअरिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सोलापूर विभागातील 15 चालकांनी अर्ज केला 



असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.सोलापूर विभागातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला मागील महिन्यात ब्रेक लागला. त्यामुळे काही चालक-वाहक कामावर पुन्हा रूजू झाले. उपस्थित चालक-वाहकांच्या भरवशावर एसटीची प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली. मात्र,



 मोठ्या प्रमाणावर एसटीची चाके जागेवरच थांबली असल्याने एसटी महामंडळाला मागील दोन महिन्यांत मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. संपामुळे एसटीच्या बसेस चालवण्यासाठी महामंडळ अनेक पर्यायी मार्गाचा अवलंब करीत आहे. मागील महिन्यात खासगी बसेसच्या आधारे प्रवासी वाहतूक सेवा सुरू केली. 



परंतु आता बुधवार ता. 5 जानेवारी रोजी एक परिपत्रक जारी करीत सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग देऊन बसेस चालविण्याची तयारी करण्यात आल्याचे यावेळी अधिका-यांकडून सांगण्यात आले. त्यासाठी पात्र उमेदवारांना तीन दिवसाच्या आत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.ठळक बाबी..



सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 62 पेक्षा अधिक वय नसावे

सेवाकाळात गंभीर किंवा प्राणघातक अपघात नसावा

सेवा पुस्तिका व चारित्र्य चांगले असावे

20 हजार रुपये मासिक वेतन

आठवडी रजासोबत 26 दिवसाची असणार ड्युटी

उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर छाननी होईल

मान्यताप्राप्त एजन्सीच्या माध्यमातून चालक घेण्यात येतील

इच्छुक सेवानिवृत्ती कर्मचारी डबल ड्युटी करू शकतील



एसटीमध्ये अनेक वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्त झालेल्या चालकांना पेन्शन मिळते. मात्र, महागाईच्या जमान्यात पेन्शनच्या रकमेत त्यांच्या गरजा भागविणे शक्‍य होत नाही. त्यामुळे कामासाठी इच्छुक असलेल्या अनेक सेवानिवृत्त चालकांना कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामाची संधी मिळाली आहे.



सोलापूर विभागात सेवानिवृत्त झालेले अनेक एसटी चालक आहेत. मात्र त्यांना सेवेत घेण्यापूर्वी त्यांची क्षमता, काम, व रेकॉर्ड पाहूनच त्यांना संधी देण्यात येईल.


- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर

Post a Comment

0 Comments