दिलासा... भारतात संपूर्ण लॉकडाउनची गरज नाही
काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत होती. मात्र आज देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काल, मंगळवारच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. काल देशात २ लाख ३८ हजार १८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. मात्र आज यामध्ये ४४ हजारांनी वाढ होऊन २ लाख ८२ हजार ९७० नव्या कोरोनाबाधितांची नोंद २४ तासांत झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ४४१ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ८८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.
देशात एकाबाजूला कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, त्याप्रमाणे ओमिक्रॉनची रुग्ण संख्या वाढत आहे. कालच्या तुलनेत आज ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत ०.७९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
देशात आतापर्यंत ८ हजार ९६१ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. दरम्यान, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असली तरी सरकारकडून लॉकडाउनचा कोणताच निर्णय घेतलेला नाही. बहुतांशी राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे तर काही राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत.
अशातच भारताने संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन लावावे कि नाही यावर जागतिक आरोग्य संघटनेने आपले मत मांडले आहे. डब्ल्यूएचओचे भारतातील प्रतिनिधी रॉड्रिको एच. ऑफ्रिन यांनी याविषयी माहिती दिली आहे.
भारतासारख्या देशात, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन लादणे आणि प्रवासावर बंदी घालणे यासारखी पावले हानी पोहोचवू शकतात. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जीवन आणि रोजगार दोन्ही वाचवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ऑफ्रिन म्हणाले की, संपूर्ण लॉकडाउन लादण्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त आहे,
कारण संसर्ग रोखण्यासाठी लादलेल्या निर्बंधांमुळे खूप आर्थिक नुकसान होते. कोरोना विषाणूच्या साथीचा सामना करण्यासाठी, जोखमीनुसार बंदी घालण्याचे धोरण आखले पाहिजे. डब्ल्यूएचओ प्रवास बंदीची शिफारस करत नाही किंवा लोकांच्या हालचालींवर पूर्ण बंदी घालण्याचा आग्रह धरत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
0 Comments