शहरात १०० टक्के लसीकरण होण्यासाठी मुख्याधिकारी केंद्रे मैदानात
वाड्या,वस्त्यांवर जाऊन नागरिकांचे प्रबोधन
सांगोला (प्रतिनिधी) :राज्यात ओमायक्रोन चा संसर्ग वाढून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट गडत होत असताना सांगोला शहरात १००% नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. कैलास केंद्रे हे स्वतः मैदानात उतरले असून त्यांनी वाड्या, वस्त्यांवर जाऊन नागरिकांना लस घेणे बाबत आवाहन करून प्रबोधनाची जोरदार मोहीम सुरू केली आहे. आजअखेर सांगोला शहरातील ८६% म्हणजेच २३,६५० नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस तर ५८% म्हणजेच १५,९५० नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे.
सांगोला नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सुरुवाती पासूनच शहरात प्रभागनिहाय १० पथके गठीत करून नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण मोहीम राबविली आहे. परिणामी शहरात आजअखेर ८६% लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरात लस न घेतलेला एकही व्यक्ती राहणार नाही यासाठी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी विशेष प्रबोधन मोहीम सुरू केली आहे.
शहराचे १००% लसीकरण पूर्ण करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या १० पथकांनी सर्वे करून शहराच्या कोण कोणत्या भागांमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस न घेतलेले नागरिक आहेत हे निश्चित केले.
मुख्यतः हे प्रमाण शहरातील वाड्या, वस्त्या व विशिष्ट भागांमध्ये असल्याचे लक्षात आल्याने मुख्याधिकारी केंद्रे यांनी स्वतः या ठिकाणांना भेटी देत नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यास सुरुवात केली आहे.
लसीकरण न केलेल्यांवर केवळ कारवाई करून न थांबता दुसऱ्या बाजूला वाड्या, वस्त्यांवर जाऊन नागरिकांच्या प्रबोधनाची मुख्याधिकारी केंद्रे यांनी सुरू केलेली मोहीम नक्कीच कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या मोहिमेची सुरुवात शहरातील कोपटेवस्ती, भोकरे वस्ती, आनंद नगर या भागातून केली असून यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या बरोबर माजी नगरसेवक सतीश सावंत, नगरपरिषदेचे अधिकारी विजय कन्हेरे, अमित कोरे, नयन लोखंडे, नवज्योत ठोकळे इत्यादी उपस्थित होते.
0 Comments