हा कसला चमत्कार म्हणायचा? कंटेनर ट्रॅक्टरला धडकला... पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला.. अन् कंटेनरमध्ये चक्क 22 लाखांचा गुटखा सापडला!
इंदापुरात सध्या अनेक चमत्कारिक गोष्टी घडत आहेत. त्यातीलच एक गोष्ट काल संध्याकाळी घडली. आयशर कंपनीचा एक कंटेनर अपघातामुळे पोलिसांच्या हाती लागला आणि अपघाताने हातात लागलेल्या कंटेनरमध्ये होता चक्क 22 लाखांचा गुटखा..! अचानक हातात आलेल्या कंटेनर मुळे पोलिसांना देखील एक मोठा गुन्हा उघडकीस आणण्याचे श्रेय मिळाले आणि तब्बल 47 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
इंदापूरच्या पुणे सोलापूर रस्त्यावर हा अपघात घडला. यामध्ये आणि हनीफ सय्यद (राहणार बेंगलोर) याने हा कंटेनर चुकीच्या पद्धतीने रस्त्याचे नियम डावलून भरधाव वेगाने कंटेनर चालवत उसाच्या भरलेल्या ट्रॉली ला पाठीमागून धडक दिली. यामध्ये हनीफ सय्यद किरकोळ जखमी झाला. याशिवाय ट्रॅक्टर आणि ट्रेलरचे देखील मोठे नुकसान झाले.
हा अपघात घडल्यानंतर पोलिस त्या ठिकाणी पोचले. त्यांनी कंटेनर ताब्यात घेतला. या कंटेनर ची पाहणी केल्यानंतर पोलिसांना देखील धक्का बसला. दरवाजा उघडून पाहिल्यानंतर तब्बल 22 लाख 27 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. 45 प्लास्टिकच्या पोत्यामध्ये हा गुटखा दडवला होता. इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे सीएनजी पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला.
पोलिसांनी या प्रकरणामध्ये KA01 AF 3396 हा कंटेनर ताब्यात घेतला असून, हनीफ सय्यद याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यातील शिपाई सुहास सिकंदर आरणे यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक श्री मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माने तपास करत आहेत.
0 Comments