सोलापूर विभागात लालपरी हळूहळू पूर्वपदावर,112 बसेसच्या फेऱ्या सुरु ; प्रवाशांना दिलासा
राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 75 दिवसांपासून बंद असलेली लालपरीची बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत असून, 112 बस धावत आहेत. यातून 2 हजार 845 प्रवाशांनी प्रवास केला.
कमी प्रमाणात का असेना, बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मुख्य मागणीसाठी तब्बल 75 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. संपामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील बससेवा ठप्प झाली होती. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून तुरळक प्रमाणात बससेवा सुरू करण्यात महामंडळाला यश आले आहे.
दोन दिवसांपासून तर 100 बस रस्त्यावर धावत आहेत. तुळजापूर, पंढरपूर, पुणे, लातूर, कराड, हैदराबाद, धाराशिव, उमरगा, अक्कलकोट, नळदुर्ग, टेंभुर्णी, बार्शी, दुधनी, करमाळा, नगर, सांगोला, जत, अकलूज, आटपाडी, कुर्डुवाडी, मंगळवेढा या मार्गावर बस धावत आहेत.
प्रवाशांचाही बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर-पुणे, सोलापूर-हैदराबाद बसमध्ये, तर पाय ठेवायलादेखील जागा मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत एसटीच्या फेऱ्या होत आहेत. यातून 2 हजार 845 प्रवाशांनी प्रवास केला आहे. एसटी बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत असून, लवकरच पूर्ण क्षमतेने बसेस रस्त्यावर धावतील, अशी अपेक्षा एसटी महामंडळाला आहे.
संपानंतर एसटी महामंडळाचे 1100 कर्मचारी रुजू झाले आहेत. चालक, वाहक, यांत्रिक तसेच प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना नवी वेतनवाढ मान्य आहे, असे कर्मचारी कामावर रुजू होत आहेत, तर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध महामंडळाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोलापूर विभागातील 9 आगारांतील 377 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, तर 28 कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. 150 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 23 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
0 Comments