महिलेनं स्वत:च पुसलं कुंकू; वडिलांनीही दिली साथ, महाराष्ट्राला हादरवणारी घटना
बीड जिल्ह्याच्या माजलगाव येथील धरणात अडीच महिन्यांपूर्वी एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला होता. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
बीड, 14 डिसेंबर: बीड (Beed) जिल्ह्याच्या माजलगाव येथील धरणात (Majalgaon Dam) अडीच महिन्यांपूर्वी एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला होता. संबंधित तरुणाने आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात झाला. याबाबत कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. या घटनेचा तपास सुरू असताना मृत तरुणाच्या भावानं धक्कादायक खुलासा केला आहे. मृत भावाच्या पत्नीने आणि सासऱ्यानेच ही हत्या केली असल्याची तक्रार भावानं दाखल केली आहे.
27 सप्टेंबर 2021 रोजी माजलगाव धरणात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, संबंधित मृतदेह तालखेड येथील रहिवासी असणाऱ्या दत्तात्रय रामकिसन घायाळ (वय-30) यांचा असल्याचं समोर आलं. पण दत्तात्रय यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचं गूढ बनलं होतं. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
पोलीस या घटनेचा तपास करत असताना, मृत दत्तात्रय घायाळ यांचा भाऊ पवन घायाळ यानं 12 डिसेंबर रोजी पोलिसांत एक तक्रार दाखल केली आहे. मृत दत्तात्रय यांच्या पत्नीने आणि सासऱ्यानेच त्याची हत्या केल्याची तक्रार भावाने केली आहे. जमीन नावावर का करून देत नाही, या कारणातून सासरे जनार्दन म्हस्के (65) आणि पत्नी गीता घायाळ यांनीच दत्तात्रय यांच्या डोक्यावर आणि कपाळावर बोथट हत्याराने वार केल्याचं भावाने पोलिसांना सांगितलं आहे.
खून केल्यानंतर आरोपी बापलेकीनेच दत्तात्रय यांचा मृतदेह माजलगाव येथील धरणात टाकून दिल्याचंही भावानं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नी आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास माजलगाव शहर पोलीस करत आहेत.

0 Comments