सोलापूर : शिंगणापूर घाटातील खोल दरीत कोसळली कार ! माय - लेकराचा मृत्यू
नातेपुते (सोलापूर) : शिखर शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील माण तालुक्यातील भवानी घाटात पाचशे फुट खोल दरीत आज सकाळी साडेआठच्या दरम्यान कार कोसळली. शिखर शिंगणापूरहून नातेपुतेकडे जात असताना भवानी घाटात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.या अपघातात गाडीतील माय-लेकराचा जागीच मृत्यू झाला.
गजानन सर्जेराव वावरे (वय 55) व त्यांच्या आई हिराबाई सर्जेराव वावरे (वय 85), अशी मृत्यू झालेल्या माय-लेकराची नावे आहेत. शिखर शिंगणापूर येथील स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने घाटातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. वावरे माय-लेक हे थदाळे (ता. माण) येथील रहिवाशी आहेत. सध्या नाशिक येथील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीस असलेले गजानन सर्जेराव वावरे हे सोसायटीच्या मतदानासाठी सोमवारी थदाळे या आपल्या मूळगावी आले होते.
आज सकाळी गजानन वावरे व त्यांची आई हे दोघेजण नाशिककडे जात होते. पण शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात पाचशे फूट खोल दरीत त्यांची कार कोसळली. शिखर शिंगणापूर येथील स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. गाडीत दोघेच प्रवास करत होते. दोघांना उपचारासाठी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. या अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नातेपुते पोलिस अधिक तपास करत आहेत.

0 Comments