google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारती साठी १५ कोटी रुपये मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

सांगोला येथील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारती साठी १५ कोटी रुपये मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील

 सांगोला येथील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारती साठी १५ कोटी रुपये मंजूर - आमदार शहाजीबापू पाटील



सांगोला (वार्ताहर) विविध शासकीय विभागाच्या कार्यालया करिता आरक्षण क्रमांक ६० येथे नवीन कोर्ट इमारतीच्या समोर नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी १५ कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडून काल दि.६ डिसेंबर रोजी मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.


             सांगोला तालुक्यातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व शासकीय कार्यालये एकाच मध्यवर्ती इमारतीमध्ये असावीत यासाठी आमदार शहाजीबापू पाटील आग्रही होते. तहसील कार्यालयाची इमारत १८८७ साली बांधली होती त्याला १३२ वर्षे झाली तरी या जुन्या इमारतीमधून तहसीलचा कारभार चालत आहे. शिवाय कृषी खाते, तालुका क्रीडा अधिकारी, सहकार विभाग, वैधमापन विभाग या विभागांना स्वतःचे कार्यालय नसून भाड्याच्या जागांमध्ये यांचे कामकाज चालते शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये नवीन विश्रामगृहाचे काम सुरू होणार असल्याने या विभागाला ही कार्यालयाची गरज भासणार आहे या सर्व बाबींचा विचार करता आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना भेटून सांगोला तालुक्यासाठी विविध शासकीय विभागांकरिता एकत्रीत अशी भव्य नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्याकरिता मंजुरी मिळावी अशी मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री ठाकरे व मंत्री अशोक चव्हाण यांनी या कामाला मंजुरी देऊन पंधरा कोटी रुपये मंजूर केले आहेत.


          ही नवीन इमारत नवीन कोर्ट इमारतीच्या समोरील जागेमध्ये होणार असून वंदे मातरम चौक ते मिरज रेल्वे गेट या बायपास रस्त्यावरून या इमारतीला रस्ता असणार आहे ही इमारत तीन मजली असून यामध्ये तहसील कार्यालया बरोबर सार्वजनिक बांधकाम कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, सहकार कार्यालय, सेतू, वैधमापन कार्यालय, तालुका क्रीडा कार्यालय यासह विविध विभागांची कार्यालये असणार आहेत ही इमारत अद्यावत पद्धतीने बांधली जाणार आहे. यामध्ये विविध बैठकांसाठी मिटींग हॉल, कॉन्फरन्स रूम, उपहारगृह इ. सोयी असणार आहेत. शिवाय दोन लिफ्टची व्यवस्था ही नागरिकांसाठी असणार आहे. या इमारतीला संपूर्ण कुंपणभिंत असून प्रशस्त वाहनतळा सहित बगीचा ही केली जाणार आहे ही संपूर्ण इमारत सीसीटीव्हीच्या निगराणी खाली असणार आहे. लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर या इमारतीचे काम सुरू होणार आहे.


            या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारती मुळे सांगोले शहराच्या वैभवा मध्ये भर पडणार असून तालुक्यातील नागरिकांना आपली सर्व शासकीय कामे एकाच इमारतीमध्ये करता येणार आहेत. सांगोला तालुक्यातील विकासाची सर्व प्रलंबित कामे पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही तसेच येणाऱ्या काळामध्ये शासनाकडून भरघोस निधी आणून मतदार संघातील सर्व गावांचा जास्तीत जास्त विकास करणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments