सांगोला कोपटे वस्ती , सावे रोड येथे कुलूपबंद शेडमधून ३० हजाराच्या शेळ्यांची चोरी
सांगोला ( प्रतिनिधी ) : - रानातील कुलूपबंद पत्र्याच्या शेडमधून ३० हजाराच्या ५ शेळ्या व १ बोकडाची चोरी करण्यात आली . ही घटना दि ५ डिसेंबरला रात्री ८ ते ६ डिसेंबर दुपारी १ च्या दरम्यान कोपटे वस्ती , सावे रोड , सांगोला येथे घडली . याबाबत पशुपालक महादेव वाघमारे रा . सांगोला यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे .
महादेव वाघमारे यांचे गावापासून ३ कि . मी . अंतरावर शेत असून त्यामध्ये ते शेळी पालनाचा व्यवसाय करतात . दि .५ रोजी सकाळी चरण्यासाठी सोडलेल्या ४ शेळ्या व १ बोकड सायंकाळी ६ वाजता रानातील पत्राच्या शेडमध्ये बांधल्या होत्या . ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन असल्याने कुटुंबातील सर्वजण डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून फिर्यादी व त्यांचा मुलगा दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रानात गेले .
त्यावेळी रानातील पत्राच्या शेडचे कुलूप तोडलेले व शेडमधील प्रत्येकी ५ हजार रूपये किंमतीच्या २ शेळ्या , ४ हजार रूपये किमतीच्या ३ शेळ्या व ८ हजार रूपये किंमतीचे १ बोकड अश्या एकूण ३० हजार रुपये किंमतीच्या ५ शेळ्या व एक बोकड चोरीस गेल्याचे लक्षात आले . याबाबत वाघमारे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे .

0 Comments